आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात - प्रकरण १


परिचय 


आजच्या जगात आर्थिक साक्षरतेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पैसा हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. यामुळे आर्थिक शिक्षण हे एक जीवन कौशल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी दिले गेले पाहिजे हे खरे असले तरी, आपल्याला कोणी धनवान व्यक्ती त्याच्याकडील आर्थिक ज्ञान देईल असे कदापी होणार नाही. आपण स्वतःच आवश्यक असे आर्थिक ज्ञान मिळवले पाहिजे व आपल्या कुटुंबीयांना आर्थिक साक्षर बनवले पाहिजे. आपल्याला आर्थिक उत्पादनांची गुंतागुंत, फसव्या आणि पॉन्झी योजनांचा प्रसार, सेवानिवृत्तीनंतर चांगल्या दर्जाचे जीवनमान मिळविण्यासाठी पैशाची जमावा-जमाव इत्यादीसारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमुळे उत्पन्न आणि खर्चाच्या योग्य व्यवस्थापनासह वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच हे छोटेसे माहितीपर पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. 

  आर्थिक शिक्षण आपल्याला आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यास मदत करते आणि आपले उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि दायित्वे योग्यरित्या व्यवस्थापित करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते, फसव्या योजनांपासून सावध करते, ज्यामुळे आपले चांगले आर्थिक कल्याण होऊ शकते. 

  आर्थिक नियोजन प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यकच आहे. आर्थिक नियोजन हे बचतीच्या पलीकडे जाऊन बर्‍याच गोष्टीबाबत लागू पडते, आणि हेच आपण लक्षात घेतेले पाहिजे. आर्थिक नियोजन म्हणजे एक उद्देश असलेली गुंतवणूकच आहे आणि ही भविष्यातील उत्पन्नाची बचत व खर्च करण्याची आपण तयार केलेली योजनाच आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणून जाणीवपूर्वक आर्थिक नियोजनाचे धडे घेणे प्रत्येकासाठी महत्वाचे ठरते. 

  या साहित्यामधून आर्थिक नियोजन, आर्थिक साक्षरतेतील प्रमुख संकल्पना, विविध गुंतवणुकीचे पर्याय, बचत आणि गुंतवणूक उत्पादने, विमा आणि निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती नियोजन, पॉन्झी व फसव्या योजनांपासून सावधगिरी, कर बचत पर्याय, गुंतवणूकदार या सर्व संकल्पना स्पष्ट होतात आणि हे साहित्य वैयक्तिक व सामाजिक अर्थ विश्वाचे योग्य आकलन तुम्हाला प्रदान करते. हे छोटेसे पुस्तक सामान्य गुंतवणूकदारांसाठीच आहे आणि हे वाचून पूर्ण झाल्यावर, वाचकांना त्यांच्या वैयक्तिक जमा-खर्चाची अधिक चांगली समज आणि उत्तम व्यवस्थापन करण्याचे ज्ञान मिळण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांना आपले आर्थिक कल्याण साधता येईल. हे आर्थिक शिक्षण प्रत्येक पालकाने स्वतः आर्थिक ज्ञान घेऊन आपल्या मुलांना शालेय जीवनापासूनच शिकवणे आवश्यक आहे. मुलांना लवकरात लवकर बचतीची सवय लावणे, त्यांना आर्थिक साक्षर करून गुंतवणूक करायला शिकवणे व त्यांचे आर्थिक भविष्य सहजपणे सुरक्षित करणे या गोष्टी साध्य होतील या हेतूने ही माहिती आपल्यासमोर मांडत आहे. असे आर्थिक शिक्षण आपण पिढ्यानपिढ्या घेत-देत राहिलो तर काही वर्षातच आपला मराठी समाज  हा 'सुशिक्षित व श्रीमंतांचा समाज' म्हणूनही नक्कीच ओळखला जाईल व आपली ही ओळख कधीही पुसणार नाही याची तीळमात्र शंका नाही.   
◆◆◆