गुंतवणूक म्हणजे काय ?
लहानपणापासूनच आपण आपल्या जीवनामध्ये कळत-नकळत वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींबद्दल शिकत असतो. आता आपण गुंतवणूक हा विषय जाणीवपूर्वक एक आर्थिक संकल्पना या दृष्टीकोणातून अभ्यासणार आहोत. गुंतवणूक म्हणजे जाणीवपूर्वक, पैशावर पैसा कमवण्यासाठी, आपली आर्थिक संपत्ती वाढवण्यासाठी केलेला व्यवहार असतो. आपल्याकडील संपत्ती घर, जमीन, गाडी, रोख रक्कम, दागिने अशा व यासारख्या अनेक विविध स्वरुपात विभागलेली असते. हीच संपत्ती भविष्यात आपल्याला आणखी संपत्ती कमवण्यासाठी वापरता येते, पण त्यासाठी योग्य प्रकारची गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न मिळविणे आवश्यक आहे. आपल्याकडे फक्त संपत्ती असणे म्हणजे खूप काही आहे, आपल्याला आणखी कुठे विशेष गुंतवणूक करायची गरज नाही असा अनेकांचा समज असतो. हा असा समज काहीप्रमाणात योग्यही आहे, कारण जमीन, सोने अशा आपल्याकडील संपत्तीच्या किंमतीत वेळेसोबत वाढ होतच असते. परंतु आजपर्यंत त्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे म्हणजे भविष्यातही वाढ होणारच असा समज चुकीचाच आहे. भविष्यात त्यांच्या किमती काही कारणास्तव कमीही होऊ शकतात हे लक्षात घेऊन विविध ठिकाणी योग्य प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. याचबरोबर आपल्याकडील विविध वस्तू, उपकरणे, वाहने यांची किंमत ते जसे जुने होत जाईल तसे कमीच होणार आहे. आपण एखादी गाडी घेतली आणि पाच वर्षांनंतर ती विकली तर आपल्याला खरेदीच्या किंमतीपेक्षा कमीच किंमत मिळणार आहे. म्हणून अशा किंमत कमी होणार्या वस्तु गरज असेल तरच खरेदी केलेल्या फायद्याचे आहे. असे असले तरी तुम्ही तुमच्याकडील गाडी भाड्याने देऊन उत्पन्न कमवू शकता. मग हे आशाप्रकारे गाडी भाड्याने देऊन उत्पन्न कमावणे म्हणजे गुंतवणूकच होय. याचप्रकारे तुमच्याकडे एखादे घर असेल, जमीन असेल तर तेही भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न कमवू शकता. याचप्रकारे तुम्ही कोणत्याही वस्तूचा किंवा निव्वळ पैशाचा वापर करून उत्पन्न कमवू शकता. यावरून असे कळते की आपल्याला उत्पन्न कमवून देणारे व्यवहार म्हणजेच गुंतवणूक होय. तुम्ही एखादी नोकरी करता ती सुद्धा एकप्रकारची गुंतवणूकच आहे, कारण तुम्ही तुमचे कष्ट, कौशल्य कामाच्या ठिकाणी गुंतवता आणि त्याच्याच आधारावर तुम्हाला उत्पन्न मिळते. परंतु नोकरी हा तुमच्या प्राथमिक उत्पन्नाचा मार्ग आहे, अशा प्राथमिक उत्पन्न मिळवून देणार्या व्यवहारांना आपल्याला तशा अर्थाने गुंतवणूक म्हणता येणार नाही. तुम्ही जे प्राथमिक उत्पन्न कमवता त्याचा दुसर्या ठिकाणी उपयोग करून इतर मार्गाने पैसे कमवण्याच्या हेतूने केलेला व्यवहारच आपल्याला गुंतवणूक म्हणून गणता येईल.
गुंतवणूक आपण अनेक प्रकारे करू शकतो. पारंपरिक पद्धतीने म्हटले तर जमीन, घर, सोने खरेदी इत्यादी. परंतु ही गुंतवणूक आपण बहुतेक वेळा नकळतपणे करत असतो, म्हणून याव्यतिरिक्त जाणीवपूर्वक व पैसे कमवण्याच्या हेतूने केलेले व्यवहारच आपल्याला गुंतवणूक म्हणून विचारात घ्यायला हवेत. एका मोठ्या काळासाठी गुंतवणूक केली तर त्यातून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकते, गुंतवणूक करून मिळणारे उत्पन्न हे वेळ व व्याजदर किंवा परताव्याचा दर यावर अधिक अवलंबून असते. यासंदर्भातील एक उदाहरण आपण पाहू :
राम व शाम हे दोघेजण 12% व्याजदराने एकाच वेळी महिन्याला 1000 रु बँकेत गुंतवायला सुरू करतात. राम दहा वर्षासाठी गुंतवणूक करतो तर शाम फक्त पाचच वर्षासाठी गुंतवणूक करतो. गुंतवणुकीचा काळ संपल्यावर रामला 2 लाख 30 हजार रुपये इतके एकूण पैसे मिळतात व 1 लाख दहा हजार इतके निव्वळ उत्पन्न मिळते तर शामला फक्त 12 हजार 500 रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. आता, याच उदाहरणात व्याजदर 6% केला तर रामला मिळणारे निव्वळ उत्पन्न हे 44 हजार इतकेच असेल. यावरून आपल्याला हे समजते की जास्त काळासाठी व जास्त व्याजदराने गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. जेवढ्या जास्त काळासाठी आणि जास्त व्याजदराने आपण गुंतवणूक करू तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला परताव्याच्या रूपात उत्पन्न मिळणार आहे. व्याजदरातील एखादा टक्का फरकही एका दीर्घ काळानंतर आपल्या उत्पन्नात मोठा फरक घडवून आणतो.
◆◆◆