गुंतवणूक करणे का गरजेचे आहे ?
आपल्यापैकी अशी कोणी व्यक्ती आहे का जिला आपल्या कुटुंबाला घेऊन मस्तपैकी भारताची, विदेशाची सफर, पर्यटन करायला आवडणार नाही ? असा कोणी आहे का ज्याला एक चांगले घर बांधण्याची, खरेदी करण्याची ईच्छा नाही ? असा कोणी आहे का ज्याला आपल्या कुटुंबासाठी चारचाकी गाडी नको आहे ? किंवा असातरी कोणी आहे का ज्याला आपल्या आयुष्यात कोणतेच आर्थिक ध्येय नाही ? ज्याला स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी काहीच करायचे नाही ? असा कोणतेही आर्थिक ध्येय किंवा इतर ध्येय नसलेला माणूस संसारिक जीवनात शोधुनही सापडणार नाही. साधू, सन्यासी यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांना संसारिक कुटुंब नसतं. आपण सगळे कुटुंबात राहणारे आणि सामाजिक जीवन जगणारे लोक आहोत, आपल्या विविध गरजा आहेत, ध्येये आहेत, आपल्याला विविध सुखांचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली संकटं आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नयेत याची आतापासूनच व्यवस्था करायची आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, पृथ्वी जरी सूर्याभोवती फिरत असली तरी तिच्यावर राहणार्या माणसांचे जग हे पैशाच्या भोवती फिरत आहे. पैसा हा मानवी जीवनाचा महत्वाचा घटक बनला आहे. आपल्याला आपल्या गरजा, ध्येये पूर्ण करण्यासाठी, विविध सुखांचा अनुभव घेत एक आनंदपूर्वक जीवन जगण्यासाठी पैशाची आवश्यकता आहेच. अनेक वेळा पैशाअभावी सुखाची वाट पाहावी लागते, कधी कधी त्यापासून कायमचे वंचित राहावे लागते. उपलब्ध संपत्तीचे नियोजन करून गुंतवणूक केल्यामुळे ही सर्व सुखे आपल्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होऊ शकतो. केवळ एकाच नोकरीतून किंवा एकाच व्यवसायातून मिळणारे, म्हणजेच फक्त एकाच मार्गातून मिळणारे उत्पन्न आजच्या महागाईच्या काळात आपल्या दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागविता भागविताच संपून जात आहे आणि पैशाची बचत करणे हे एक मोठे अवघड काम होऊन बसले आहे. गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न या सगळ्या अवघड परिस्थितीवर मात करण्यासाठी आर्थिक बळ देते. हे आर्थिक बळ आपल्याला काहीही अतिरिक्त काम न करता मिळते ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या पैशाला, संपत्तीला कामाला लावणे एवढेच काय ते काम करायचे आहे. त्यानंतर पैसाच आपल्यासाठी काम करत राहील आणि आपल्याला उत्पन्न मिळत राहील. आजच्या काळातले महान गुंतवणूकदार व प्रचंड संपत्ती असलेले वॉरन बफे म्हणतात, 'कधीही फक्त एकाच प्रकारच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून राहू नये, उत्पन्नाचे दुसरे मार्ग गुंतवणुकीच्या माध्यमातून बनवावे'. अतिरिक्त उत्पन्नामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळते म्हणजे हवा तसा, हवा तेवढा पैसा हव्या त्या गोष्टींवर खर्च करण्याचे आर्थिक बळ येते. हवा तेवढा म्हणजे जितका आवश्यक आहे तितका. अतिरिक्त उत्पन्न फक्त याच कारणासाठी गरजेचे नाही, तर आणखी बर्याच कारणांसाठी गरजेचे आहे. परंतु त्या कारणांचा आपण बहुतेक वेळा विचारही करत नाही आणि मग ऐनवेळी आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची पाळी आपल्यावर येते.
जग झपाट्याने बदलत आहे. आपली पुढची पिढी आपल्यासोबत राहील की नाही, आपल्याला सांभाळेल की नाही याची काही गॅरंटी नाही. जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये रिटायरमेंटनंतर आपल्या स्वतःलाच पुढचे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगावे लागते. अशा परिस्थितीसाठी आपण आतापासूनच तयारी करणे ही काळाची गरज आहे. रिटायरमेंटनंतरचे आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी आतापासूनच स्वतंत्र अशी गुंतवणूक करणे सुरू केले पाहिजे. हे करताना भविष्यातील महागाईचा विचार करून आपल्याला एकूण किती पैशांची गरज असेल याचा नीट हिशेब करून तेवढ्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे एकरकमी किंवा महिन्याच्या महिन्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवावे लागतील. रिटायरमेंट ही गोष्ट आयुष्याच्या फार पुढच्या टप्प्यावरची झाली, त्याआगोदरही आपल्याला अनेक टप्प्यांवर पैसे खर्च करण्याची आवश्यकता असेल. जसे की, लग्न, बाळाचा जन्म, बाळाचे संगोपन, शिक्षण, त्याच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला उद्योग-व्यवसाय उभा करून देण्यासाठी भांडवल, कुटुंबाचा विस्तार झाल्यावर त्यांच्यासाठी घर, अनपेक्षित घटनांना सामोरे जाण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी, आजारपणातून बरे होण्यासाठी आणि अशा बर्याच गोष्टींसाठी पैसा खर्च केल्याशिवाय पर्याय नसतो. याशिवाय विविध भौतिक सुखांसाठी चैनीच्या वस्तू, गोष्टींवरही पैसे खर्च करावे लागतातच अन्यथा फक्त जेवणे आणि झोपणे अशाप्रकारचे आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही. असे आयुष्य तर जनावरंही जगतात. आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत, आपण माणूस आहोत याचेही भान असणे आवश्यक आहे. आयुष्यात आनंदासाठी आवश्यक असणारी जास्तीत जास्त सुखे, अनुभव आपण आपल्या स्वतःला आणि कुटुंबाला देऊ शकलो तरच आपण एक यशस्वी आयुष्य जगलो असं मी म्हणेन. नाहीतर वेळ निघून गेल्यावर अमाप पैसा आपल्याकडे आला तर त्याचा तितकासा आनंद घेण्यासाठी उपयोग होणार नाही. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या वेळी लागणारा पुरेसा पैसा आपल्याकडे असायलाच हवा अशी व्यवस्था आपण जाणीवपूर्वक निर्माण केली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे, पुरेशा वस्तु आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरेशी माणसं असणं अतिशय गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपले आयुष्य योग्य नियोजन करूनच जगले पाहिजे आणि पैशाचे नियोजन हा यातला सर्वात महत्वाचा घटक आहे.
गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी आधी बचत करावी लागते. आपण आपल्या प्राथमिक उत्पन्नातील काही भाग बचत करून तो गुंतवणुकीसाठी उपलब्ध केला तरच आपल्याला कुठेतरी गुंतवणूक करून अधिकचे उत्पन्न मिळविता येणार आहे. म्हणून बचत हे गुंतवणुकीच्या उद्देशाने टाकलेले पहिले पाऊल होय. आपल्यापैकी बरेच जण असे असतील जे महिन्याला लाखो रुपये कमवत असतील. त्यांना असे वाटत असेल की आपण इतके पैसे कमवतो की आपल्या पुढच्या दोन तीन पिढ्या आरामात जगतील, आपल्याला विशेष गुंतवणूक करण्याची काय गरज ? असा कोणी विचार करत असेल तर त्याने हाही विचार करायला पाहिजे की भविष्यात काहीही होऊ शकते, भविष्याचे भाकीत करता येत नाही. आपण ज्या प्रदेशात, देशात राहतो तिथले सरकार उद्या काहीही नियम-कायदे बनवेल, श्रीमंतांवर अफाट टॅक्स लावेल, श्रीमंताची संपत्ती जप्तही करेल, काय होईल काही सांगता येत नाही. कदाचित आपल्या संपत्तीवर चोरट्यांचा दरोडाही पडेल ! अशा सर्व प्रकारच्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्याचे बळ आतापासूनच मिळवले पाहिजे. आवश्यक ते इन्शुरन्सही केले पाहिजेत. आपण आपली संपत्ती सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवली तर बरीचशी संकटं आपोआप निवळतील यात शंका नाही !
◆◆◆