गुंतवणूकीचे प्रकार
गुंतवणूक म्हणजे काय, ती का करावी हे आपण आत्तापर्यंतच्या प्रकरणांमध्ये शिकलो. आता आपल्याकडील पैसे, संपत्ती कोणकोणत्या ठिकाणी गुंतवू शकतो, कोणते मार्ग सुरक्षित आहेत याची थोडक्यात माहिती घेऊ. जर आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि ते पैसे बुडाले किंवा त्या व्यवहारातून मोठा तोटाच आपल्याला सहन करावा लागला तर आपले आर्थिक भविष्य बळकट होण्याऐवजी अनेक संकटांना सामोरे जाण्याची पाळी आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे सगळ्यात महत्वाचे आहे. सध्या आपण अनेक प्रकारे गुंतवणूक करू शकतो, त्या सगळ्याबद्दल टप्प्या-टप्प्याने जाणून घेऊ.
अ) निश्चित नफा कमवून देणारी गुंतवणूक :
या प्रकारे गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला वर्षाला काही ठराविक टक्के परतावा मिळत जातो. बँकेतील फिक्स्ड डिपॉजिट, सरकारी योजनांमधील गुंतवणूक, बंकांच्या विविध योजना असे मार्ग निश्चित नफा कमवून देतात. बँकेत पैसे गुंतवताना चांगली बँक निवडण्याची जबाबदारी आपली असते. शक्यतो राष्ट्रीयकृत बँका निवडणे सुरक्षित असते. बँकेतील फिक्स्ड डिपॉजिटवर सध्या विविध बँकांमध्ये 6 ते 7 टक्के व्याजदर मिळतो, तर सरकारी योजनांमध्ये 8 ते 9 टक्के व्याजदर मिळतो. हा व्याजदर काळनुसार कमी अधिक होत राहतो. जेव्हा जेव्हा चांगला व्याजदर असणारी गुंतवणूक योजना एखादी बँक किंवा सरकार घोषित करते तेव्हा तेव्हा अशा योजनांवर लक्ष ठेऊन आपण त्या-त्या वेळी योग्य तेवढी गुंतवणूक करू शकतो. सरकारी योजनांतील गुंतवणूक ही आजच्या घडीला सर्वात सुरक्षित अशी गुंतवणूक आहे, येथे आपला पैसा बुडण्याचा धोका खूपच कमी असतो, पैसा बुडाला तरी सरकार त्याची जाबाबदारी घेते शिवाय अनेक योजनांमध्ये सरकार टॅक्सची सवलतही देते. परंतु योजनेच्या सर्व नियम व अटी व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय कोणत्याही सरकारी किंवा खाजगी योजनेत पैसे गुंतवणे जोखमीचे ठरू शकते. आजच्या घडीला केंद्र सरकारच्या अनेक गुंतवणूक योजना सर्वांसाठी खुल्या आहेत. त्यांची माहिती आपण एका स्वतंत्र प्रकरणामध्ये घेऊ.
ब) इक्विटि किंवा शेअर्समधील गुंतवणूक :
शेअर्स हे फक्त शेअर बाजारातील कंपन्यांचेच असतात असे नाही. आपण एखाद्या सहकारी बँकेचे, कारखान्याचे किंवा आणखी कोणत्याही सहकारी संस्थेचे शेअर्स घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्या सहकारी संस्थेचा सभासद बनावे लागते. तुमच्या भागातील अशा काही चांगल्या सहकारी संस्था असतील तर तुम्ही त्यांचे सभासद बनून भागीदार होऊ शकता; पण इथे तोटा असा आहे की, हवे तितके शेअर आपल्याला घेता येत नाहीत. एकूण सभासदांमध्ये विभागणी करून जेवढे शेअर प्रत्येकाच्या वाट्याला येतील तेवढेच आपल्याही वाट्याला येतील. असे असले तरी तुम्ही एका चांगल्या नफा कमावणार्या सहकारी संस्थेचे भागीदार झालात तर वर्षकाठी काही हजार रुपये लाभांश म्हणून तुम्हाला मिळू शकतात.
शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारात उपलब्ध असतील तेवढे शेअर आपण खरेदी करू शकतो. हवा तितका वेळ आपल्याकडे ठेऊ शकतो. शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी आपल्याला ट्रेंडिंग व डिमॅट अकाऊंट काढावे लागते. हे अकाऊंट आपण शेअर बाजारातील एखाद्या ब्रोकर कंपनीकडे किंवा मोठ्या बँकांमध्ये जाऊनही काढू शकतो. एकदा हे अकाऊंट उघडले की आपण मोबाइलवरून ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही उपलब्ध कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतो. शेअरची किंमत वाढली की आपण तो विकून नफा कमवू शकतो. एवढेच नाही तर काही कालावधीसाठी शेअर होल्ड करून ठेवले आणि त्या कंपनीने लाभांश वाटप केला तर तो लाभांशही आपण कमवू शकतो. शेअर बाजारात कधी कधी एखाद्या कंपनीचा शेअर भाव कैक पटींनी उसळतो त्यामुळे कमी कालावधीत प्रचंड स्वप्नवत वाटणारा नफा मिळू शकतो, मात्र आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर केवळ एखादे टक्का लोकच यातून पैसा कमवतात, बाकीचे लोक आहे तेवढा पैसा घालवून दिवाळखोर होऊन बसतात. शेअर बाजार हा जास्त जोखमीचा व्यवहार आहे.
क) रियल इस्टेटमधील गुंतवणूक :
या प्रकारची गुंतवणूक आपण वर्षांनुवर्षापासून कळत-नकळतपणे आपली गरज म्हणून करत आलो आहोत. आपल्या पूर्वजांनी काहि शे रुपयांत घेतलेल्या जमिनीचे, घराचे भाव आज लाखो, करोडो रुपये झाले आहेत. अशाप्रकारे आपण जमिनी, घरे घेऊन गुंतवणूक करू शकतो. यात ही जोखीम आहे की, जमिनीचे भाव कालांतराने कमीही होऊ शकतात; पण जमीन आपल्या ताब्यात राहते, आपण तिचा वापर करू शकतो ही एक दिलासादायक बाब आहे. आपण ही जमीन, घर भाड्याने देऊन त्यातूनही उत्पन्न मिळवू शकतो. याप्रकारची गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक असली तरी अलीकडच्या काळात जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवा-फसवीची प्रकरणे बरीच वाढली आहेत. एकच जमीन खोटे कागद बनवून अनेक जणांना विकली जात आहे. रोख दिलेल्या रकमेचा काही पुरावा ठेवला नाही तर समोरचा व्यक्ती आपण त्याला पैसे दिलेच नाहीत असा दावा करून पैसे हडपण्याचे प्रकारही घडत आहेत. या अशा गोष्टींची काळजी घेऊनच जमिनीचे, घराचे, इमारतीचे व्यवहार केले पाहिजेत. अशा व्यवहारांमध्ये कागदोपत्री पुरावे ठेऊन एखाद्या चांगल्या वकिलाच्या सल्ल्याने व्यवहार करणे सुरक्षित ठरते. जमिनीचे व्यवहार करून देणारे एजंट नोंदनिकृत आहेत की नाही याचीही पडताळणी करावी. योग्य ती दक्षता घेऊन मोक्याच्या ठिकाणी जमिनी, इमारती खरेदी केल्या तर त्यातून चांगले उत्पन्न आपण सहजपणे कमवू शकतो. यासाठी खूप पैसा लागतो, लाखो रुपये जवळ असतील तरच हे शक्य आहे. परंतु अनेक जणांनी मिळून एकत्रित पैसे जमवून अशा मोक्याच्या ठिकाणच्या इमारती, दुकानाचे गाळे विकत घेणे शक्य आहे.
ड) मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक :
ही गुंतवणूक आपण पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत; पण बहुतेक वेळा आपल्या नकळतच ही गुंतवणूक झालेली आहे. आपण लग्न, विविध सण-समारंभ साजरे करताना आवर्जून सोने, चांदी खरेदी करतो. कालांतराने त्याचे भाव वाढतात आणि यामुळे आपल्या संपत्तीत निश्चितच वाढ होते. ही गुंतवणूक चांगला नफा मिळवून देणारी, गरज पडली तर आपली आर्थिक नड भागवणारी सुरक्षित गुंतवणूक आहे. आपल्याकडील मौल्यवान धातू नीट सांभाळून ठेवणे हेच काय ते काम आपल्याला करायचे आहे. सोन्या-चांदीच्या वस्तु चोरी होऊ नयेत, हरवू नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच, या वस्तु खरेदी करताना त्याची प्रत तपासून बघितली पाहिजे, भेसळयुक्त धातू विकण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. खरेदीच्या पावत्या नीट जपून ठेवल्या पाहिजेत. सोन्या-चांदीच्या वस्तूचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, नडी-अडीला या वस्तु बँकेत तारण म्हणून ठेऊन आपण पटकन कर्ज म्हणून पैसे उचलू शकतो. इतर गोष्टींच्या बाबतीत ही सवलत क्वचितच मिळते. मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक ही सध्यातरी चांगला नफा कमवून देणारी, विनाझंझट, साधी-सोपी, सर्वांना करता येण्यासारखी गुंतवणूक आहे. ज्याला इतर गुंतवणुकीतले काहीच कळत नाही त्याने किमान या प्रकारे तरी थोडी थोडी गुंतवणूक केली पाहिजे.
इ) म्युचुयल फंडातील गुंतवणूक :
गुंतवणुकीचा हा प्रकार सध्याच्या काळात लोकप्रिय होत चालला आहे. ज्या व्यक्तींना इतर आर्थिक व्यवहारांच्या डोकेदुखीपासून दूर राहून त्या इतर प्रकरांपेक्षा थोडासा जास्त किंवा त्यासमान नफा कमवायचा असतो ते लोक म्युतुयल फंडाकडे वळताना दिसत आहेत. शिवाय इथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारची सहजता असल्यामुळेही लोकांचा कल इकडे वाढत आहे. आपण अगदी काही मिनिटांत मोबाइलवर अॅप इंस्टॉल करून त्याद्वारे विविध कंपन्यांच्या म्युचुयल फंडात अगदी शंभर रुपयांपासून जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतो. सोने, जमीन, बँक एफडी, सरकारी योजना याच्याशी तुलना केली असता, म्युचुयल फंडातील गुंतवणुकीतून अधिक टक्के परतावा मिळत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्युचुयल फंड म्हणजे लोकांकडून फंड गोळा करून तो शेअर मार्केट, रियल इस्टेट, कर्ज देणार्या संस्था, सरकारी व प्रायव्हेट बॉन्ड या व अशा विविध ठिकाणी गुंतवला जातो आणि त्यातून मिळणार्या नफ्यामुळे म्युचुयल फंडच्या एका युनिटची किंमत वाढते. हे युनिट्स विकून आपण तो नफा कमवू शकतो. आज अनेक प्रायव्हेट कंपन्या, सरकारी बँका स्वतःचे म्युचुयल फंड चालवतात. हा फंड विविध ठिकाणी गुंतवण्यासाठी या कंपन्या त्यांचे त्या-त्या क्षेत्रातील ज्ञान असलेले लोक कामावर ठेवत असतात. झालेल्या नफ्यातून आपला हिस्सा फी महणून या कंपन्या आपल्याकडून घेतात. शेअर बाजाराप्रमाणे ही गुंतवणूक काहीशा प्रमाणात जोखमीचीच आहे. ही जोखीम पत्करून आपण यात पैसे गुंतवू शकतो. कोणत्याही म्युचुयल फंडात गुंतवणूक करण्यापूरर्वी तो फंड चालवत असलेली कंपनी, बँक भरवसा ठेवण्यालायक आहे की नाही हे तापासून व सर्व नियम-अटी वाचूनच पैसे गुंतवणे आपल्या हिताचे ठरते.
ई) क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक :
गुंतवणुकीचा हा प्रकार शेअर मार्केटशी मिळता जुळता आहे. शेअर मार्केट मध्ये विविध कंपन्यांची शेअर्सची किंमत कमी-जास्त होते तर क्रिप्टो करन्सी मध्ये त्या एका करन्सीची किंमत कमी-जास्त होते. जसे रुपया ही आपली करन्सी (चलन) आहे तसे एक काल्पनिक, डिजिटल रूपात बनवलेले चलन म्हणजेन क्रिप्टो करन्सी. सध्या 'बीटकॉईन' , 'डोजकॉईन', 'इथेरियम' अशी बरीच काल्पनिक चलने गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. आपण एक साधे मोबाइल अॅप डाउनलोड करून या असल्या काल्पनिक कॉईनची खरेदी करू शकतो, आपण खरेदी केलेले कॉईन त्या अॅप मध्ये डिजिटल रूपात आपल्या अकाऊंटवर राहतात, तेथून ते विकून आपण परत आपल्या बँक अकाऊंटमध्ये ते पैसे घेऊ शकतो. लोकांची मागणी व या कॉईनची उपलब्धता एवढ्याच आधारावर याची किंमत वर-खाली होत राहते. या काल्पनिक चलनात जगातील कोणीही पैसे गुंतवू शकतो. ही काल्पनिक करन्सी कोणीही नियंत्रित करत नाही असे म्हटले जाते परंतु मला त्या बाबतीत शंकाच आहे. याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, कोणतेही खरेदी-विक्रीचे पुरावे ह्यात राहत नसल्याने दहशतवादी संघटना, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेऊन हवा तितका फंड गोळा करू शकतात हा एक मोठा धोका सर्वच जगासाठी आहे आणि म्हणूनच भारतासह अनेक देशांमध्ये या चलनांना कायदेशीर मान्यता नाही. या चलनाच्या किंमती काही काळातच प्रचंड वाढलेल्या आहेत आणि याच लालसेपोटी जगभरातील तरुणाई ह्याच्यात पैसे गुंतवत आहे; पण हेच चलन जेव्हा खाली कोसळते तेव्हाही असेच प्रचंड वेगाने कोसळते, म्हणून हा सगळ्यात जास्त जोखमीचा व्यवहार आहे. ज्याला जोखीम घ्यायला आवडते त्याने विचारपूर्वक केवळ एखादा टक्का रक्कम यात गुंतवावी अन्यथा कधी भिकेला लागू काही सांगता येत नाही.
वरील पाच-सहा प्रकारांव्यतिरिक्त सरकारी बॉन्ड, प्रायवेट कंपनीचे बॉन्ड, इनवॉइस डिस्कौंटिंग असेही गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवायचे मार्ग उपलब्ध आहेत. परंतु हे मार्ग सध्यातरी सामान्य- मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी तितकेसे सोयिस्कर नाहीत, थोडे किचकट आहेत, शिवाय एक ठराविक अशी मोठी रक्कम याच्यात गुंतवावी लागते म्हणून त्याबद्दल आपण इथे माहिती घेणे टाळले आहे.
◆◆◆