विविध आर्थिक संकल्पना
पर्सनल फायनान्समधील काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या व्यक्तीने वैयक्तिक अर्थ व्यवस्थापन करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, याची माहिती मुद्देसूदपणे घेऊ.
1. सेव्हिंग्ज (बचत) म्हणजे काय ?
आपण आपल्या उत्पन्नापैकी आपला खर्च वगळता शिल्लक राहिलेला जो पैसा असतो त्याला 'बचत' असे म्हटले जाते.
उत्पन्न : पगार, वेतन किंवा इतर विविध स्रोतांमधून आपल्याला होणारी पैशाची कमाई म्हणजे उत्पन्न.
खर्च : अत्यावश्यक आणि अनावश्यक अशा दोन्ही वस्तूंचा, सेवांचा उपभोग घेण्यासाठी आपण आपल्याकडील उत्पन्नातून जो पैसा इतरांना देतो तो पैसा म्हणजे खर्च.
म्हणून, बचत = उत्पन्न - खर्च, असे सूत्र आपल्याला मांडता येईल.
आपण बचत म्हणून बँकेच्या बचत खात्यात ठेवलेले पैसे थोड्या प्रमाणात व्याज मिळवून देतात आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते काढणे सोपे आहे. आपण सेव्हिंग्ज बँक खाती आणि पोस्ट ऑफिस बचत खाती इत्यादींमध्ये आपले बचतीचे पैसे साठवू शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडेच घरातच बचतीचे पैसे ठेवू शकता, परंतू त्यावर तुम्हाला कोणी व्याज देणार आहे का ? बँक आपल्याला व्याज देते आणि आपला पैसा आणखी वाढतो, म्हणून बचतीचे पैसे प्राथमिक गुंतवणूक म्हणून बँकेत ठेवणे फायदेशीर ठरते.
आपण सर्वजण सहसा आपली अल्पकालीन उद्दिष्टे किंवा तातडीच्या गरजा बचतीच्या पैशातून पूर्ण करतो. बचत हा आपल्या प्राथमिक उत्पन्नाचा एक भाग आहे जो नेहमीच्या खर्चासाठी वापरला जात नाही. यात कमी किंवा नगण्य धोका आणि उच्च लिक्वीडिटी आहे. लिक्वीडिटी म्हणजे हवे तेव्हा, हवा तितका बँकेतील पैसा काढून घेण्यासाठी किंवा हवे तेव्हा हवे तितके पैसे बँकेत ठेवण्याची असलेली सोय/सहजता. आपण नेहमी अशा सहजता असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, आपल्याला दीर्घ काळासाठी पैशाची गरज नसेल तर मग सहजता नसलेल्या परंतु जास्त उत्पन्न मिळवून देणार्या ठिकाणी गुंतवणूक करायला हरकत नाही.
2. मालमत्ता आणि दायित्वे म्हणजे काय ?
तुमच्या मालकीच्या आणि भविष्यात तुम्हाला उत्पन्न मिळवून देणार्या गोष्टी म्हणजे तुमच्या मालमत्ता आहेत आणि तुम्ही देणी असलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा अशा गोष्टी ज्यातून तुम्हाला काही उत्पन्न मिळणार नाही, उलट खर्चच करावा लागेल त्या म्हणजे दायित्वे आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही बचत केली आणि नंतर मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केली तर ती तुमची मालमत्ता आहे. कारण त्यातून तुम्हाला व्याजरूपी उत्पन्न मिळणार आहे. तर दुसरीकडे, तुम्हाला कोणाचे पैसे देणे असेल जसे की कर्ज, खरेदी केलेल्या वस्तूचे मुल्य, तर ती म्हणजे दायित्वे. याशिवाय गाडी, मोबाइल सारख्या अनेक अशा वस्तू ज्यातून तुम्हाला काहीही अधिकचे उत्पन्न मिळणार नाही, उलट त्या सुस्थितीत राहाव्या म्हणून खर्चच करावा लागतो, अशा वस्तूही दायित्वेच म्हणाव्या लागतील.
3. कर्ज म्हणजे काय ?
तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त झाल्यावर पैशाची कमतरता भरून काढण्यासाठी बँकेकडून किंवा इतर व्यक्तींकडून व्याजाने घेतलेले पैसे म्हणजे कर्ज असते. कर्ज घेतल्यामुळे आपल्याला घेतलेल्या रकमेपेक्षा जास्तीचे पैसे द्यावे लागतात, म्हणून कर्ज घेणे नेहमी टाळले पाहिजे. केवळ आपली आर्थिक नड असेल व आपण घेतलेले कर्ज फेडण्याची निश्चित अशी योजना आपण आखली असेल व त्या दृष्टीकोणातून आर्थिक नियोजन केले असेल तरच कर्ज घेणे फायद्याचे ठरते. क्षमता नसताना कर्ज घेऊन आपण स्वतःसह त्या कर्ज देणार्यालाही आर्थिक संकटात नेऊन सोडतो. कर्ज हे अनेक प्रकारचे असते, विविध कारणांसाठी घेतले जाऊ शकते, याची माहीती पुढे एका स्वतंत्र प्रकरणात घेऊ.
4. वेळेसोबत पैशाचे मूल्य :
जसजसा वेळ निघून जाईल तसतसे तुम्हाला हे समजेल की जर 10 वर्षांपूर्वी तुम्हाला 50 रुपयांत एकवेळचे पूर्ण जेवण करणे परवडत असेल तर आज तुम्हाला तेवढ्या किंमतीत पोटभर नाश्ताही मिळणार नाही. म्हणजे आजच्या पाचशेच्या नोटेला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत येणार्या पाच वर्षात नसणार आहे, कारण आज तुम्ही पाचशेला जेवढ्या वस्तु घेऊ शकता त्या येणार्या काळात महागणार आहेत, मग फक्त पाचशे आकडा नोटवर असून काय उपयोग? आता, नोट जरी सारखीच असली तरी, जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही बरेच काही करू शकता कारण कालांतराने तुम्ही याच पैशावर व्याज मिळवून तुमचे पैसे वाढवू शकता. आज 500 रुपये मिळवून, तुम्ही ते गुंतवणूक करून आणि ठराविक कालावधीत व्याज किंवा भांडवली वाढ मिळवून तुमच्या याच पैशाची भविष्यातील रक्कम वाढवू शकता. म्हणजे वेळेसोबत बदलणारे पैशाचे मूल्य लक्षात घेतले तर आपण असे म्हणू शकतो की 'वेळ हाच पैसा आहे'. तुमच्याकडे सध्या असलेल्या पैशाचे मूल्य भविष्यात तेवढेच असेल असे नाही. महागाईमुळे ते मूल्य कमी होण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे.
गुंतवणुकीतील विलंब तुम्हाला महागडा ठरू शकतो (उदाहरणार्थ):
समजा, तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी भविष्यात 20 वर्षाच्या कलावधीत 15 लाख रु. जमवायचे आहेत. म्हणून तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली.
20 वर्षात हवे असलेले पैसे : 15 लाख
व्याजदर : 8% प्रती वर्ष
जर तुम्ही आजपासूनच पुढील वीस वर्षासाठी गुंतवणुकीस सुरुवात केली तर महिन्याला 2546 रु गुंतवावे लागतील. जर तुम्ही तीन वर्षांनंतर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर पुढील 17 वर्षात तितकाच परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला महिन्याला 3747 रु गुंतवावे लागतील. तुम्ही जितका उशीर कराल तितका तुमचा हफ्ता वाढत जाणार आहे. म्हणून शक्य तितके लवकर आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्यासाठी तोच फायद्याचा व्यवहार ठरणार आहे.
5. महागाई व तिचे गुंतवणुकीवर होणारे परिणाम :
महागाईचा अर्थ मुळात वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणे असा होतो. कालांतराने, वस्तू आणि सेवांची किंमत जसजशी वाढत जाते, तसतसे एक रुपया किंवा 100 रुपयांची, वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाची क्षमता कमी होत जाते. म्हणजेच पैशाचे अवमूल्यन होते. आर्थिक नियोजन करताना महागाईचा तुमच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना महागाईची खूप भीती वाटते कारण त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होते. उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी १२ रुपये किमतीच्या पाणीपुरीच्या थाळीची किंमत आता २० रुपये आहे. किमतीत वाढ ही पाणीपुरीचे जास्त प्रमाण किंवा चांगल्या गुणवत्तेमुळे होत नाही; तर महागाईमुळे पाणीपुरीसाठी लागण्यार्या घटकांच्या किमतींवर परिणाम होतो, आणि त्यामुळे किमतीत वाढ होते.
महागाईचा विपरीत परिणाम टाळण्यासाठी गुंतवणूकदार म्हणून आपण कोणती पावले उचलू शकतो याबद्दल आता जाणून घेऊ. तुमचा 'रिअल रेट ऑफ रिटर्न' ठरवण्याचा प्रयत्न करा किंवा चलनवाढीच्या परिणामाचा विचार केल्यावर तुम्हाला किती परतावा अपेक्षित आहे त्यानुसार ठरवून गुंतवणूक करा. वेळेसोबत महागाईमुळे होणारे पैशाचे अवमूल्यन टाळण्यासाठी तुम्ही आज तुमच्याकडे उपलब्ध असलेले पैसे आजच्या महागाई दराच्या समान किंवा जास्त दराने परतावा मिळेल अशाप्रकारे गुंतवू शकता. आज 5 टक्के महागाई दर मानला जातो, मग आपण त्यापेक्षा अधिक टक्के व्याज, नफा मिळवला तरच आपल्या झालेल्या पैशाचे अवमूल्यन भविष्यात भरून काढण्याची आर्थिक ताकद आपल्याकडे येणार आहे. आज असे चित्र आहे की सेव्हिंग्ज अकाऊंटला फक्त 3 ते 4% व्याज मिळते. मग आपले पैसे आपण वाढवत आहोत का ? याच कारणांमुळे आर्थिक साक्षर व्हावे लागते, नाहीतर नकळत होत असलेले आर्थिक नुकसान कळतही नाही.
6. कंपाउडिंग म्हणजे काय ?
सरळव्याज पद्धतीने तुम्ही फक्त मुद्दलावर व्याज मिळवता ( मुद्दल म्हणजे तुम्ही सुरुवातीला गुंतवलेली रक्कम), तर चक्रवाढ पद्धतीने तुम्ही मुद्दलावर व्याज मिळवताच व त्यासोबत नव्या जमा व्याजावरही व्याज मिळवता! हे असे चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवणे म्हणजेच कंपाउंडिंग होय. अनेक वर्षे गुंतवणूक तशीच ठेवल्यावर तुम्हाला कंपाउंडिंगची ताकद अनुभवायला मिळते, जेव्हा गुंतवणुकीच्या अनेक पटींनी आपल्याला परतावा मिळतो. ही कंपाउंडिंगची पॉवर समजण्यासाठी पुढील तक्ता आपण अभ्यासू :
वरील उदाहरण दाखवते की 1,000 रु.ची सुरुवातीची गुंतवणूक कालांतराने 31,409 रु. पर्यंत कशी वाढते. जेव्हा परतावा पुन्हा गुंतवला जातो, तेव्हा तुम्हाला परताव्यावर परतावा आणि परत त्या परताव्यावर परतावा मिळतो आणि असेच चालू राहते.
7. गुंतवणूक दुप्पट कधी होणार हे तपासणे :
समजा तुम्ही 6% व्याजदराच्या अपेक्षेने एक रक्कम गुंतवली तर ती रक्कम किती वर्षात च्रकरवाढ पद्धतीने दुप्पट होईल ? याचे उत्तर मिळविणे अतिशय महत्वाचे आहे,कारण एखाद्या दुसर्या ठिकाणी कमी वर्षांमध्ये गुंतवणूक दुप्पट होत असेल तर तिकडे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. आपण एक उदाहरण पाहू :
6% व्याजदराने 10,000 चे 20,000 व्हायला किती वर्षे लागतील ?
उत्तर : 10,000*(1.06^12) = 10,000*2 = 20,000
येथे, 1.06 चा 12 वा घातांक असा आकडा आहे. 1.06 हे 6% साठी घेतले आहे, घातांकतील 12 हा आकडा वर्षे दर्शवितो, म्हणजे 12 वर्षांनी 6% दराने एखादी रक्कम दुप्पट होते. याचप्रकारे 8% दराने काढायचे झाले तर (1.08^9) असे करावे लागेल तेव्हा उत्तर 2 येईल. तुम्हाला प्रत्येकवेळी घातांकातील आकडा बदलून पहावे लागेल की कोणत्या आकड्याने आपण घेतलेल्या व्याजदरासाठी उत्तर 2 येते. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या व्याजदराने किंवा परतावा टक्क्याने एखादी रक्कम किती वर्षात दुप्पट होते हे तपासू शकता आणि ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने कमीत कमी वर्षात जास्त परतावा मिळतो अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता.
◆◆◆