आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात - प्रकरण ६


आर्थिक नियोजन 

आर्थिक नियोजन ही एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक गरजांचा अंदाज घेण्याची आणि त्याच्या किंवा तिच्या जीवनकाळात त्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वयोग्य अशा योजना आखून त्या लागू करण्याची एक प्रक्रियाच आहे. उदाहरणार्थ, मुलाचा जन्म, शिक्षण, घर खरेदी, लग्न किंवा एखाद्या आजारासारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि अपघात, मृत्यू किंवा पूर सारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आपल्याला आतापासूनच योग्य अशा आर्थिक योजना आखल्या पाहिजेत अन त्यानुसार पैशाचे व्यवहार केले पाहिजेत.  

A. आर्थिक नियोजनाची प्रक्रिया : 

1. स्वतःची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे ते निश्चित करा 
2. तुमची आर्थिक उद्दिष्टे/ध्येये ओळखा आणि निश्चित करा 
3. तुमच्या आर्थिक ध्येयपूर्तीसाठी योग्य ते गुंतवणुकीचे मार्ग ओळखा 
4. आर्थिक ध्येय गाठण्यासाठी सर्व पर्यायांचे मूल्यांकन करा आणि रणनीती बनवा 
5. तुमची आर्थिक कृती योजना तयार करा आणि त्याची अंमलबजावणी करा 
6. आर्थिक योजना वेळेसोबत तपासून त्यात आवश्यक सुधारणा करा
 
हे सर्व आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेतील आवश्यक असे मुद्दे आहेत, आता आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 
 
स्वतःची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे ते निश्चित करा : 
 
तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी योजना करायची असेल तर सर्वप्रथम तुमची सध्याची आर्थिक स्थिती समजून घेणे आवश्यक आहे. तुमचे उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत, खर्च, मालमत्ता आणि दायित्वे/देणी नेमके किती व काय आहेत याचा हिशेब तुम्हाला माहीत असला पाहिजे. तुमची निव्वळ संपत्ती म्हणजे तुमच्या मालकीची असलेली मालमत्ता वजा तुमची दायित्वे होय. समजा एका बाजूला तुमच्याकडे सोने, घर, बँक बॅलन्स हे सर्व मिळून 1 कोटी इतकी मालमत्ता आहे आणि दुसर्‍या बाजूला घरासाठी घेतेलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज, जीवनावश्यक वस्तू व सेवांसाठी लागणारा खर्च हे सर्व मिळून 70 लाख इतकी दायित्वे आहेत तर तुमची निव्वळ मालमत्ता म्हणजे 1 कोटी - 70 लाख = 30 लाख.
  
  तुमची सध्याची आर्थिक स्थिती तुमची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता दर्शवते, जसे की घर खरेदी करणे, उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे, भविष्यातील वैद्यकीय खर्च इ. 
 तुमची आर्थिक उद्दिष्टे/ध्येये ओळखा आणि निश्चित करा : 

  तुमची आर्थिक उद्दिष्टे ही मालमत्ता संपादन करणे, आणीबाणीसाठी बचत करणे, तुमची भविष्यातील आर्थिक सुरक्षा,  एखादी गुंतवणुक करणे अशी विविध प्रकारची असू शकतात. 

एखाद्या व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे खालीलप्रमाणे वर्गीकृत केली जाऊ शकतात : 

a. मूलभूत आर्थिक उद्दिष्टे (अन्न, वस्त्र, निवारा इ.) 
b. दुय्यम किंवा वरील गोष्टींच्या पुढची उद्दिष्टे (शिक्षण, घर, लग्न इ.) 
c. निवृत्तीचे नियोजन (म्हातारपणासाठी) 

  विविध व्यक्ती त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन आणि कर नियोजन धोरणे वापरू शकतात. ही उद्दिष्टे एखाद्या व्यक्तीच्या जीवनकाळात बदलत असतात आणि म्हणूनच परिस्थितीतील बदलानुसार कोणत्याही सुधारणांसाठी आर्थिक योजनेचे नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे, त्या योजना वेळेसोबत पुन्हा पुन्हा तपासल्या पाहिजेत. आर्थिक योजना बनवताना, प्रथम आपल्याकडील नियोजित बचत रकमेची खात्री करावी आणि नंतरच पैसे खर्च करण्याची योजना करावी. संपत्ती एका रात्रीत निर्माण होत नाही. त्यासाठी विशिष्ट अशी योग्य आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे. आर्थिक उद्दिष्टे ही नेहमी विशिष्ट व मोजकी, मोजण्यायोग्य, गाठली जाऊ शकणारी, वास्तववादी आणि वेळेवर आधारित असावीत. जिथपर्यंत आपली झेप काही केल्या जाणारच नाही अशी स्वप्नवत आर्थिक उद्दिष्टे नसावीत. 

  विशिष्ट म्हणजे तुम्हाला नेमकं काय व कधी मिळवायचं आहे हे विचारात घेऊन बनवलेली उद्दिष्टे, मोजण्यायोग्य म्हणजे अशी आर्थिक उद्दिष्टे जी कुठपर्यन्त पूर्ण झाली आहेत व त्यांना पूर्ण व्हायला आणखी किती काळ लागेल याचे सहज मोजमाप करता येते, गाठली जाऊ शकणारी म्हणजे तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर आधारित व तुम्हाला कोणतेही इतर नुकसान न होता पूर्ण केली जाऊ शकणारी उद्दिष्टे, वास्तववादी म्हणजे तुमच्याकडील उपलब्ध भांडवल गुंतवूण पूर्ण केली जाऊ शकणारी उद्दिष्टे, वेळेवर आधारित म्हणजे एका विशिष्ट वेळेत ती पूर्ण झाली पाहिजेत अशी योजना आखून बनवलेली उद्दिष्टे. ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ खर्च करून पूर्ण झालेली उद्दिष्टे नुकसानकारकच आहेत कारण त्यांनी वेळेचे नुकसान केले आहे आणि वेळ हाच पैसा हे आपण जाणतोच. 

  ध्येय-आधारित गुंतवणूक वैयक्तिक आणि विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. या दृष्टिकोनाचा फोकस हा विविध उद्दिष्टांच्या भविष्यातील मूल्यावर पोहोचणे आणि नंतर प्रत्येक ध्येयासाठी वेगवेगळा असा मालमत्तेचा हिस्सा गुंतवून ठेवणे व ते प्रत्येक आर्थिक ध्येय प्राप्त करणे असा आहे.  गुंतवणूक करताना ही रणनीती अवलंबण्यासाठी, व्यक्तीचे वय, जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या लिमिटनुसार नियोजन केले पाहिजे. 

स्टेप 1: विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे ओळखा 

  प्रत्येक गुंतवणुकीला विशिष्ट उद्दिष्टासह नियोजित करण्यासाठी योग्य योजना आखणे महत्त्वाचे आहे. उद्दिष्टे आणि आकांक्षा यांना प्राधान्य देणे आणि ते पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतील याचा अंदाज लावणे महत्त्वाचे आहे. 

स्टेप 2 : उद्दिष्टांचे अल्प-मुदतीचे, मध्यम मुदतीचे दीर्घ मुदतीचे असे वर्गीकरण करा 

  अल्प-मुदतीची उद्दिष्टे ही सामान्यत: काही महिन्यांपासून ते एक वर्षाच्या कालावधीत उद्भवण्याची अपेक्षा असलेल्या आर्थिक आवश्यकता असतात. मालमत्ता खरेदी करणे, तुमचा स्वतःचा उपक्रम सुरू करणे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणे यासारखी उद्दिष्टे मध्यम-मुदतीचे आर्थिक उद्दिष्ट असू शकतात. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आठ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी असू शकतो उदाहरणार्थ मुलाचे लग्न किंवा सेवानिवृत्तीचे नियोजन. 

स्टेप 3 : मालमत्तेचे विभाजन करा 

  तुमचे पैसे विविध मालमत्ता वर्ग जसे की इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवण्याची ही एक रणनीती आहे जी गुंतवणूकदाराचे उत्पन्न आणि जोखीम यांना अनुकूल असेल. हे एक गुंतवणूक धोरण आहे ज्याचा उद्देश जोखीम आणि त्यातून मिळणार्‍या परताव्याच्या स्वरूपात एखाद्या व्यक्तीच्या उद्दिष्टांनुसार, जोखीम पत्करण्याच्या सहनशीलतेनुसार आणि गुंतवणुकीच्या लिमिटनुसार त्याच्या पोर्टफोलिओच्या मालमत्तेची विभागणी करून त्याची गुंतवणूक संतुलित करणे असा आहे. म्हणजेच, तुमची वेगवेगळी तीन उद्दिष्टे असतील तर तुमच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध एकूण मालमत्तेचे तीन हिस्यांत विभाजन करा. एक हिस्सा पहिल्या उद्दिष्टासाठी सोने खरेदी करून गुंतवा, दूसरा हिस्सा दुसर्‍या उद्दिष्टासाठी शेअर खरेदी करून गुंतवा आणि तिसरा हिस्सा तिसर्‍या उद्दिष्टासाठी जमीन खरेदी करून गुंतवा. याचा अर्थ वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वेगवेगळा हिस्सा प्रत्येक उद्दिष्टासाठी वेगळ्या-वेगळ्या अशा ठिकाणी गुंतवणे हे मालमत्ता विभाजन करून साध्य करायचे आहे. याच्यामुळे एका ठिकाणी तोटा झाला तरी इतर उद्दिष्टांवर त्याचा परिणाम होणार नाही.  

  तुमचे वय, जीवनशैली आणि कौटुंबिक वचनबद्धतेनुसार तुमची आर्थिक उद्दिष्टे बदलू शकतात. गुंतवणुकीसाठी तुमच्या मालमत्तेचे हिस्से करताना, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विविध मालमत्तेमध्ये वितरण करत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे उदा. इक्विटी, बाँड रिअल इस्टेट इ. मध्ये. यामुळे आपण वरी चर्चिल्याप्रमाणे जोखीम विभागली जाते व जास्तीत जास्त उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता वाढविण्यास मदत मिळते. 

स्टेप 4 : योग्य गुंतवणूक आणि वितरण निवडा 

  योग्य जोखीम-परताव्याच्या संयोजनावर पोहोचणे आणि योग्य प्रकारे संपत्तीचे भाग करून योग्य असा गुंतवणूक पर्याय निवडणे कठीण वाटू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टासाठी, वैविध्यपूर्ण संपत्ती वितरणासह जास्तीत जास्त परतावा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणे यातच शहाणपण आहे. संपत्तीचे विविध ठिकाणी वितरण करून गुंतवणूक केल्यामुळे जोखीम कमी होते आणि एकूण जास्त परतावा मिळू शकतो. या प्रकारे गुंतवणूक केल्यामुळे जरी शंभर टक्के फायदाच होईल याची खात्री किंवा हमी जरी नसली तरी ज्याप्रकारे एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवून नुकसान झाले तर मोठे नुकसान होण्याची जोखीम असते, ती जोखीम  या पद्धतीमुळे नक्कीच कमी होते. 

स्टेप 5 : आर्थिक योजनांचे पुनरावलोकन आणि सुधारणा करा 

  ध्येयपूर्तीच्या ट्रॅकवर राहण्यासाठी, तुमची उद्दिष्टे आणि गुंतवणुकींच्या प्रगतीचे नियमितपणे पुनरावलोकन करा. तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक आणि म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करा. काही उत्पादने विशिष्ट गरजांसाठी तयार केलेली वाटू शकतात, परंतु ती प्रत्यक्षात एखाद्याच्या पोर्टफोलिओसाठी उपयुक्त नसतीलही. अशा अनोळखी गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती ठेवा व त्यापासून सावध रहा.
◆◆◆