आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात - प्रकरण ७

विविध सरकारी गुंतवणूक योजना



सुकन्या समृद्धी योजना (SSY) : 
 
दहा वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावे बँकेत किंवा पोस्टात अकाऊंट उघडू शकता. एक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच अकाऊंट उघडता येते.एकदा अकाऊंट उघडल्यावर  एकूण 21 वर्षानंतर या योजनेतील सर्व पैसे काढता येतात, त्यापूर्वी मुलीचे दहावी नंतरचे उच्च शिक्षण व लग्न या दोनच कारणासाठी पैसे काढता येतात. शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते तर लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढता येते व अकाऊंट बंद करता येते. सध्या 7.6% इतका व्याजदर या योजनेसाठी मिळतो. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, योजनेतील पैश्यांवर कसलाही टॅक्स लागत नाही. अकाऊंट उघडताना 250 रुपये खात्यात भरावे लागतात, त्यांनातर महिन्याला कमीतकमी 50 रु आणि जास्तीत जास्त 12500 रु तुम्ही या योजनेत मुलीच्या नावे भरू शकता. वर्षाला दीड लाखापेक्षा जास्त पैसे या योजनेत भरता येत नाहीत. तुमचा महिन्याचा हफ्ता तुमच्या सोयीनुसार तुम्ही बदलूही शकता, किंवा वर्षातून एकदा एकगट्ठा 250 रु पेक्षा जास्त व दीड लाखापेक्षा कमी इतके कितीही पैसे खात्यात भरू शकता, महिन्याच्या महिन्याला हफ्ता भरलाच पाहिजे असे काही बंधन नाही. तुम्हाला फक्त 15 वर्ष पैसे भरायचे आहेत, पुढचे 6 वर्ष पैसे भरायचे नाहीत. ही एक अतिशय चांगली योजना आहे. टॅक्सच्या बाबतीत तर दुहेरी फायदा मिळतो कारण तुम्ही या योजनेत भरलेल्या पैशांवर इनकम टॅक्स कपात घेऊ शकता व ही योजना पूर्ण झाल्यावर मिळणार्‍या पैशांवर एकही रुपया टॅक्स द्यावा लागत नाही. समजा तुम्ही वर्षाला 12 हजार या योजनेत भरले तर 21 वर्षांनंतर 5 लाख 9 हजार मिळतात. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे.  


पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) : 

  अठरा वर्षावरील कोणीही व्यक्ती आपल्या नावे अकाऊंट उघडू शकतात, त्याचबरोबर अठरा वर्षाखालील व्यक्तींच्या नावाने त्यांचे पालक अकाऊंट उघडू शकतात. अकाऊंट उघडल्यापासून एकूण 15 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना आहे, 15 वर्षांनंतर तुम्हाला हवे असल्यास त्यानंतर कितीही वेळा आणखी 5-5 वर्ष  ती पुढे वाढवता येते. सध्या या योजनेसाठी 7.1% इतका व्याजदर दिला जातो. कमीत कमी 500 रुपये एका वर्षाला भरावे लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये एका वर्षात भरू शकता. तुम्ही महिन्याच्या महिन्याला किंवा एकगट्ठा असे तुम्हाला हवे तसे पैसे भरू शकता. सुरुवातीची पाच वर्ष पैसे काढता येत नाहीत, त्यानंतर दरवर्षी एकदा जमा रकमेच्या 50% पैसे काढता येतात. अकाऊंट उघडून एक वर्षानंतर सुरुवातीच्या 5 वर्षासाठी जमा रकमेच्या 25% इतके कर्जही या योजनेद्वारे घेतले जाऊ शकते, ज्याचा व्याजदर हा 1% इतका आहे. हे कर्ज 3 वर्षाच्या आत फेडावे लागते अन्यथा सुरुवातीपासून 6% दराने कर्जाचे व्याज भरावे लागते. केवळ 5 वर्ष पूर्ण झाल्यावरच योजनेच्या कालावधी आगोदर अकाऊंट बंद करता येते, तेही फक्त शिक्षण व मेडिकल अशा कारणासाठी.  लवकर अकाऊंट बंद केले तर 1% कमी दराने व्याज दिले जाते, जे आपल्या तोट्याचे आहे. या योजनेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेतील पैशांवर एकही रुपयाचा टॅक्स लागत नाही, त्याच बरोबर तुम्ही इतर बाबतीत दिवाळखोर जरी झालात तरी या योजनेतील पैसे त्या परतफेडीसाठी जोडले जाऊ शकत नाहीत, म्हणजेच कोणीही या पैशाला हात लावू शकत नाही. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी या योजनेद्वारे तुम्ही पैसे साठवू शकता. समजा तुम्ही वर्षाला 12000 रुपये याप्रमाणे 15 वर्ष या योजनेत पैसे भरले तर 15 वर्षानंतर तुम्हाला 3 लाख 25 हजार मिळतात, आता समजा 15 वर्षानंतर तुम्ही पैसे भरायचे बंद केले व आणखी 5 वर्ष योजना वाढवली तर 20 वर्षानंतर सध्याच्या व्याजदराने 4 लाख 58 हजार रुपये मिळतील, या सर्व पैशावर एकही रुपया टॅक्स लागणार नाही शिवाय योजनेत भरलेल्या पैशासाठी चालू आर्थिक वर्षात इनकम टॅक्स कपातही मिळवता येते, टॅक्सचा असा दुहेरी फायदा होतो. ही योजना एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेचे अकाऊंट ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये काढता येते.  


नॅशनल पेंशन स्कीम (NPS) : 

  अठरा वर्षावरील व सत्तर वर्षाखालील कोणीही व्यक्ती आपल्या नावे अकाऊंट उघडू शकतात; पण अठरा वर्षाखालील व्यक्तींच्या नावाने त्यांचे पालक अकाऊंट उघडू शकत नाहीत. या योजनेत दोन प्रकारे अकाऊंट काढता येते, एक कुठलेही बंधन व टॅक्स सवलत नसलेले (टीएर-2) आणि दुसरे सर्व' प्रकारची बंधने असलेले व टॅक्स सवलत असलेले (टीएर-1). आपल्याला टीएर-1 अकाऊंट सहज काढता येते, या योजनेमध्ये आपले वय 60 वर्ष होईपर्यन्त आपल्याला पैसे काढता येत नाहीत. पाचशे रुपये भरून हे अकाऊंट चालू होते व वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये भरणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही पैसे भरू शकता. आपण 60 वर्षाचे झाल्यावर एकूण जमा रकमेच्या 60% रक्कम काढता येते व उरलेल्या 40% रक्कमेचा आपल्याला पेन्शन प्लान खरेदी करावा लागतो, त्यामुळे आपल्याला महिन्याला पेन्शन मिळत राहते. टीएर-1 अकाऊंटचा फायदा हा आहे की आपल्याला एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही, आपण या योजनेत भरलेल्या वार्षिक दोन लाखापर्यंतच्या प्रीमियमवर इनकम टॅक्स मध्ये कपात मिळवू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण पैसे काढतो तेव्हाही एकही रुपया टॅक्स द्यावा लागत नाही. ही योजना म्युचुअल फंड सारखीच काम करते. म्युचुअल फंड मधील पैसे आपण हवे तेव्हा संपूर्णपणे काढू शकतो, या योजनेत मात्र 60 वर्ष वय झाल्यावरच फक्त 60% रक्कम काढू शकतो. परंतु मेडिकल, शिक्षण यासारख्या कामासाठी 60 वर्ष वयाच्या आगोदरही 25% रक्कम काढता येते. या योजनेतील पैसे मॅनेज करण्यासाठी विविध फंड मॅनेजमेंट कंपन्या आहेत, त्यापैकी आपल्याला हवी ती कंपनी आपण निवडू शकतो, या कंपन्यामार्फत आपला पैसा शेअर मार्केट, सरकारी बॉन्ड, प्रायव्हेट बॉन्ड अशा विविध ठिकाणी गुंतवला जातो. आतापर्यंत वार्षिक 8 ते 10% परतावा या योजनेत मिळत आला आहे. इतर सरकारी योजनांच्या तुलनेत हा परतावा खूप चांगला आहे. आपल्या रिटायरमेंट नंतर एकगट्ठा पैसे आपल्याला मिळतात व त्याचबरोबर आयुष्यभर पेन्शनसुद्धा मिळत राहते. या योजनेतील पैसा कुठे व किती जोखीम घेऊन गुंतवायचा हे आपण स्वतः निवडू शकतो, वेळोवेळी बदलू शकतो यामुळे ही एक सोयिस्कर योजना आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सहज अकाऊंट निघते.        टीएर-2 मध्ये कधीही वाटेल तेव्हा पैसे काढता येतात मात्र टॅक्स सवलत नाही. टीएर-2 अकाऊंटसाठी तुम्हाला आगोदर टीएर-1 अकाऊंट काढावेच लागते. 


कर्मचारी भविष्य निर्वाह निधि (EPF) : 

  ही योजना फक्त नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी आहे. नोकरदाराला रिटायरमेंटनंतर जी पेन्शन मिळते ती याच योजनेअंतर्गत मिळते. १९५२ पासून ही योजना भारतीय नोकरदार जनतेसाठी उपलब्ध आहे परंतु आजही याबाबत नोकरी करणार्‍या लोकांनाही व्यवस्थित माहिती नसते. फक्त सरकारी  नोकरीसाठी नव्हे तर जी प्रायव्हेट कंपनी पीएफ ऑफिस सोबत रजिस्टर्ड आहे त्या कंपनीतील प्रत्येक कर्मचार्‍याचे पैसे पगारातून काटून या योजनेत भरले जातात. या योजनेत भरलेले पैसे तीन भागात विभागले जातात. दोन हिस्से आपल्या व कंपनीच्या खात्यात व एक हिस्सा पेन्शन फंड मध्ये जातो. कंपनीचा व आपला हिस्सा हा एकूण आपलाच असतो, त्यापैकी विविध कारणासाठी आपल्याला हवे तेव्हा ७५% पर्यन्त अडवांस उचलता येतो. पेन्शन फंडातील रक्कम मात्र काढता येत नाही. दहा वर्षाच्या आत नोकरी सोडली तर पेन्शन मिळत नाही. दहा वर्ष काम केले व या योजनेत आपले पैसे दहा वर्ष जमा झाले तर मग आयुष्यभर पेन्शन मिळते. आपल्या माघारी आपल्या पत्नीलाही पेन्शन मिळत राहते. ही अतिशय चांगली योजना आहे, या योजनेत भाग घेण्यासाठी सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करावी लागते. समजा तुम्ही एका कंपनीत चार वर्ष काम केले, दुसर्‍या कंपनीत तीन वर्ष काम केले, तिसर्‍या कंपनीत तीन वर्ष काम केले, एकूण मिळून दहा वर्ष काम झाले तरीही तुम्ही पेन्शन साठी पात्र ठरता. रिटायरमेंट नंतर आपल्याला आपल्या व कंपनीच्या खात्यात जमा असलेली सगळी रक्कम मिळते, या रकमेवर वर्षाला ७ ते ८ टक्के व्याज मिळत जाते त्यामुळे ही रक्कम रिटायरमेंट पर्यन्त खूप मोठी रक्कम होते व पेन्शन फंड मधील रक्कम तशीच राहते आणि आपल्याला पेन्शन मिळत राहते. या योजनेत विनामूल्य इन्शुरन्सही आपल्याला असतो, नोकरीत असताना मृत्यू झाला तर आपल्या कुटुंबीयांना इन्शुरन्सचे पैसे मिळतात, आणि समजा नोकरीला लागून एक वर्ष झाले आणि लगेच मृत्यू झाला तर पत्नीला इन्शुरन्सचे पैसे व आयुष्यभर पेन्शन मिळते मात्र ही रक्कम खूपच थोडी असते. सरकार  भविष्यात पेन्शनची रक्कम वाढवू शकते. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करताना त्या कंपनीचे रजिस्ट्रेशन पीएफ सोबत आहे की नाही हे तपासले पाहिजे व आपल्या पगारातील पैसे काटून या योजनेत भरले पाहिजेत. 
◆◆◆