बँक अकाऊंटचे विविध प्रकार
बँकांमध्ये विविध प्रकारचे अकाऊंट असते, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.
1) बचत खाते (Savings Account) :
आपल्या बचतीचे पैसे साठवणे हा मुख्य उद्देश या प्रकारचे अकाऊंट काढण्यामागे असतो. आपण सर्वजण सुरूवातीला याच प्रकारचे अकाऊंट बँकेत काढतो. या खात्यातील जमा रकमेवर विविध बँकांमध्ये सध्या 3.5 ते 4 टक्के वार्षिक व्याज मिळते. आपल्याला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पैसे आपण या खात्यात टाकू शकतो आणि काढू शकतो. बँकेत जाऊन स्लिप भरून किंवा डेबिट कार्ड वापरुन एटीएम द्वारे आपण या खात्यातून पैसे काढू शकतो. या खात्यासोबत हवे असेल तर चेकबुकही मिळते. स्थानिक स्तरावरील सहकारी पतसंस्थामध्ये आपल्याला या खात्यावर अर्धा ते एक टक्का जास्तीचा व्याजदर मिळू शकतो. बचत खात्यातील रकमेवर बँकेला टॅक्स कट करून घेता येत नाही, मात्र आपल्या खात्यात एका वर्षात 10 लाख पेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर बँक त्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटला देते.
2) चालू खाते (Current Account) :
व्यावसायिक, उद्योगपती हे लोक याप्रकारचे अकाऊंट त्यांच्या व्यवसायासाठी वापरतात कारण याच्यात कितिही वेळा ट्रानजॅक्शन व कितीही रकमेचे ट्रानजॅक्शन आपण करू शकतो, बचत खात्याला मात्र काही लिमिट असते. मात्र या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही, मिळालेच तर ते फारच कमी असते, त्याचबरोबर या खात्यात काही ठराविक कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. असे असले तरी अनेक ट्रानजॅक्शन करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त अकाऊंट आहे. सेव्हिंग्ज अकाऊंट प्रमाणे इथेही आपल्याला डेबिट कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग या सुविधा मिळतात.
3) ठेव खाते (Fixed Deposit Account) :
एका ठराविक काळासाठी पैसे ठेवायचे असतील तर या प्रकारचे खाते निर्माण केले जाते. समजा एक वर्षासाठी पैसे ठेवायचे व एक वर्षाआगोदर काढायचेच नाहीत तर ते आपण फिक्स्ड डिपॉजिट म्हणून ठेऊ शकतो. याच्यावर सेव्हिंग्जच्या तुलनेत जास्त व्याजदर आपल्याला मिळतो. सध्या विविध बँकांमध्ये 5 ते 6 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. तुम्ही स्थानिक पातळीवरील सहकारी किंवा प्रायव्हेट पतसंस्थांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट अंतर्गत पैसे ठेवले तर 8 ते 9 टक्के व्याजदर मिळू शकतो. मात्र फिक्स्ड डिपॉजिट मधून मिळालेले व्याज जर 10 हजारपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10 टक्के टॅक्स बँक काटून घेते. तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या काळासाठी फिक्स्ड डिपॉजिट मध्ये पैसे गुंतवू शकता, काळ संपण्यापूर्वी पैसे काढले तर दंड बसतो व खूपच कमी व्याज मिळते.
4) रिकरींग डिपॉजिट अकाऊंट (RD) :
तुमच्याकडे फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी एकरकमी पैसे नसतील तर या प्रकारचे अकाऊंट सोयिस्कर ठरते. बचत खात्यापेक्षा जास्तीचा व्याजदर मिळतो. फिक्स्ड डिपॉजिटप्रमाणे काही ठराविक काळाकरिता हे डिपॉजिट करावे लागते. महिन्याच्या महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्हाला या खात्यात भरावी लागते. मुदतीच्या आगोदर तुम्हाला यातील रक्कम काढता येत नाही, तुम्ही ती काढली तर मग दंड लागतो व व्याजही कमी मिळते. वर्षानुवर्षे रक्कम जमा करत गेल्यास एक चांगला परतावा मिळू शकतो. फिक्स्ड डिपॉजिटप्रमाणे कमवलेल्या व्याजाची रक्कम दहा हजारपेक्षा जास्त असेल तर 10 टक्के टॅक्स बँक काटून घेते. विविध बँकांमध्ये 4.5 ते 6 टक्के व्याजदर मिळतो. तुम्ही स्थानिक पातळीवरील सहकारी किंवा प्रायव्हेट पतसंस्थांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट अंतर्गत पैसे ठेवले तर 8 ते 9 टक्के व्याजदर मिळू शकतो.
◆◆◆