आजच्या घडीला आपण वेगवेगळ्या कारणांसाठी, वस्तूंसाठी विविध बँकांमध्ये विविध व्याजदराने कर्ज घेऊ शकतो. यामध्ये वयानुसार, उद्योग-धंद्यानुसार विविध प्रकारच्या अनेक सवलतीसुद्धा मिळतात. या सगळ्यामुळे कर्जाचे अनेक प्रकार पाडता येतात, परंतु आपण या प्रकरणात फक्त ठळक प्रकार जाणून घेणार आहोत.
1) वैयक्तिक कर्ज :
हे कर्ज आपल्याला स्वतःच्या खर्चासाठी म्हणून उचलता येते. तुम्ही महिन्याला एक फिक्स रक्कम कमवता हे सिद्ध केले तरच या प्रकारचे कर्ज मिळू शकते. या प्रकारच्या कर्जात काही लाख रुपयेच घेता येऊ शकतात व याचा व्याजदर हा 15 ते 18% असा प्रचंड असतो. ज्या व्यक्तींकडे तारण म्हणून ठेवण्यासाठी काहीच नसते असे व्यक्ती आपल्या नडी-अडीला खर्च भागवण्यासाठी असे कर्ज घेतात. हे इतक्या महाग व्याजदराने कर्ज घेणे परवडत नसल्यामुळे खूपच कमी लोक हे कर्ज घेतात.
2) वाहन कर्ज :
तुम्हाला दोन चाकी किंवा चार चाकी किंवा कोणतेही नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर हे कर्ज अगदी सहज उपलब्ध होते. या कर्जाचा व्याजदर हा 14 ते 16 टक्के इतका असतो. हा व्याजदर वाहनाच्या किंमतीनुसार व तुमच्या कर्जफेडीच्या काळानुसार बदलत राहतो. तुम्ही जर कर्ज फेडण्यात अपयशी झालात तर बँक तुमचे वाहन जप्त करू शकते. वाहन खरेदीसाठी पुरेसे पैसे नसतील तर हे कर्ज फायदेशीर ठरते.
3) सोने तारण कर्ज :
सध्याच्या काळात कोणत्याही बँकेत अतिशय सहजपणे उपलब्ध होणारे हे कर्ज आहे. तुमच्याकडील सोन्याच्या वस्तु बँकेत गहाण ठेऊन त्या बदल्यात त्याच्या किंमतीच्या जवळपास इतके कर्ज आपल्याला ताबडतोब मिळू शकते. शिवाय याचा व्याजदर हा 10 ते 11 टक्के इतकाच असतो. आपत्कालीन वेळेस पैशाची गरज भागवण्यासाठी हे कर्ज फायदेशीर ठरते, आपली सोन्याची वस्तु न मोडता आपल्याला पैसे उचलता येतात. पैसे फेडण्यास अपयशी झाल्यास ती सोन्याची वस्तु बँक जप्त करते व ती विकून त्यातून कर्जाची रक्कम वजा करून घेते.
4) गृह कर्ज :
आपल्याला स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी खूप पैसे लागतात. आलेल्या पगारातून पैसे साठवत बसलो तर लाखो रुपये जमवायला आयुष्यही कमी पडते. नोकरदार वर्गासाठी हे कर्ज घेणे अतिशय फायदेशीर ठरते कारण तरुण वयात स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होते. घेतलेल्या कर्जाचा हप्ता आयुष्यभरात आपण हप्त्या हप्त्याने सहज फेडू शकतो. सध्या गृहकर्जासाठी सरकारही अनुदान देते, यामुळे केवळ 6 ते 7 टक्के दरात गृहकर्ज सहज उपलब्ध होते. घराचा एरिया मोठा असेल तर व्याजदर वाढू शकतो. प्रधानमंत्री आवास योजना ही गृह कर्जाशी संबंधित योजना आहे; त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
5) शैक्षणिक कर्ज :
एखाद्या प्रकारच्या शिक्षणासाठी पैसे नसतील तर आपण हे कर्ज कोणत्याही बँकेतून मिळवू शकतो. vidyalakshmi या सरकारी वेबसाइटवर रजिस्टर करून आपण आपल्याला हव्या त्या बँकेमार्फत हे कर्ज मिळवू शकतो. हे कर्ज मिळण्यासाठी त्या कॉलेजमध्ये आपले अॅडमिशन होणे आवश्यक आहे, अॅडमिशन झाले असल्याचा पुरावा सादर केला असता बँक डायरेक्ट कॉलेजला फिस पे करते. हे कर्ज 6 ते 7 टक्के इतक्या स्वस्त दरात मिळते व कॉलेज पूर्ण झाल्यावर दहा पंधरा वर्षाच्या हप्त्यात तुम्ही हे कर्ज फेडू शकता.
6) उद्योग कर्ज :
तुम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर कुठलेही तारण न ठेवता हे कर्ज घेतले जाऊ शकते. इतर कर्जांच्या तुलनेत हे कर्ज मिळविणे थोडेसे कठीण आहे कारण तुमचा उद्योग भविष्यात चालेलच व तुम्ही त्यातून कर्ज फेडण्याइतके पैसे कमवू शकता हे बँकेला पटवून द्यावे लागते, त्यासाठी तुमच्या उद्योगाचे योग्य नियोजन बँकेसमोर तुम्हाला मांडता आले पाहिजे. सरकारच्या मुद्रा योजनेद्वारे विविध किंमतीचे उद्योग कर्ज सध्या सर्वच मोठ्या बँकांत उपलब्ध आहे, विविध सवलती उपलब्ध आहेत.
7) शेतकर्यांसाठी कर्ज :
शेतकर्याला बियाणे खरेदीसाठी, शेतीशी संबंधित विविध उपकरणे, वाहने खरेदीसाठी विविध सरकारी योजनाअंतर्गत सहज कर्ज उपलब्ध होते. छोट्या शेतकर्यांना नवीन शेतजमीन खरेदीसाठी, शेतात फार्महाऊस बांधणीसाठी, शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक साहित्य, मोटारी खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून शेतकर्याचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी. त्याच बरोबर शेती आधारित उद्योग जसे की पशूपालन, दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया या सारख्या कारणासाठीही कर्ज उपलब्ध होते. शेतकर्यासाठी उपलब्ध विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन आपण आपली शेती चांगल्या व आधुनिक पद्धतीने करू शकतो.
◆◆◆