विमा व त्याचे प्रकार
विमा म्हणजे प्रीमियमच्या बदल्यात दिलेले भविष्यातील संभाव्य नुकसान भरपाईचे वचन असते. जी संस्था आपल्याला हा विमा विकते तिला 'विमाकर्ता' म्हणतात. आपण विमा विकत घेतला तर आपल्याला 'विमा धारक' म्हटले जाते. विमाधारक व विमाकर्ता यांच्यातील करारास 'विमा पॉलिसी' म्हटले जाते. छोट्याशा प्रीमियमच्या बदल्यात आपल्याला मोठ्या राशीचे आर्थिक भरपाईचे वचन मिळते. विमा हा जोखीम व्यवस्थापनाचा भाग आहे, यामुळे आपल्या भविष्यात येणार्या अनपेक्षित घटनांतून सावरण्यासाठी विमाकर्त्या संस्थेकडून आर्थिक मदतीचे वचन प्राप्त होते. सध्या विविध कारणांसाठी, वस्तूंसाठीचा व विविध प्रकारे केला जाऊ शकणारा विमा विविध सरकारी व खाजगी कंपन्यामार्फत विकला जातो, त्यापैकी काही ठळक प्रकारांची आपण थोडक्यात माहिती घेऊ.
1) जीवन विमा :
जीवन विमा वेगवेगळ्या प्रकारे घेतला जाऊ शकतो. मुख्यतः टर्म इन्शुरेंस, एण्डौमेंट इन्शुरेंस, संपूर्ण आयुष्यभरासाठी इन्शुरेंस, यूनिट लिंक्ड इन्शुरेंस या प्रकारचा जीवन विमा विकला जातो. जुन्या काळापासून बहुतेक लोक हे एण्डौमेंट इन्शुरेंस या प्रकारचा विमा घेत आले आहेत; तरी अलीकडच्या काळात टर्म इन्शुरेंस व यूनिट लिंक्ड इन्शुरेंस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण प्रत्येक प्रकाराबद्दल जाणून घेऊ.
टर्म इन्शुरेंस : समजा तुम्ही एक करोड रुपये भरपाई किमतीचा विमा घेण्याचे ठरवले तर या प्रकारचा विमा अगदी काही शे च्या प्रीमियममध्ये उपलब्ध होतो कारण ह्याचा भरलेला प्रीमियम परत मिळत नाही. काही कंपन्यांनी पैसे परत देण्याची स्कीम सुद्धा सुरू केली आहे, त्याचा प्रीमियम थोडा जास्त असतो. टर्म इन्शुरेंस हा कमी प्रीमियम मध्ये मोठा विमा उपलब्ध करतो यामुळे हा सध्या जास्त लोकप्रिय ठरत आहे.
एण्डौमेंट इन्शुरेंस : या प्रकारचा इन्शुरेंसच आपण बहुतेक वेळा घेत असतो. एलआयसीचा अशा प्रकारचा इन्शुरेंस बहुतेक लोकांनी घेतलेला आहे. या प्रकारात जर आपल्याला इन्शुरेंस पॉलिसी चालू असताना काही इजा झाली नाही तर आपण भरलेला प्रीमियम हा पॉलिसीचा काळ संपल्यावर परत मिळतो. पैसे परत मिळत असल्यामुळे लोक या प्रकारचा इन्शुरेंस सर्रास करतात पण ह्याचा प्रीमियम खूप जास्त असतो व त्याच्या तुलनेत नुकसान भरपाई किंमतही खूपच कमी असते. अलीकडच्या काळात या प्रकारचा इन्शुरेंस घेण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
व्होल लाईफ इन्शुरेंस : बहुतेक वेळा इन्शुरेंस घेताना आपण वीस वर्ष, तीस वर्ष अशा ठराविक काळाकरिता घेत असतो पण व्होल लाईफ इन्शुरेंस हा आयुष्यभरासाठी असतो. जोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरता तोपर्यंत तो चालू राहतो. नाव जरी व्होल लाईफ असले तरी शक्यतो ८० वर्ष वयापर्यंतच ही पॉलिसी असते व ८० वर्ष वय झाल्यावर पैसे परत मिळतात.
यूनिट लिंक्ड लाईफ इन्शुरेंस : हा इन्शुरेंस ULIP या संक्षिप्त नावाने ओळखला जातो. इन्शुरेंस सोबत गुंतवणूक या उद्देशाने या प्रकारचा इन्शुरेंस घेतला जातो. याच्यात भरलेल्या प्रीमियमचा काही भाग शेअर बाजारात व अन्य ठिकाणी गुंतवला जातो व त्यातून जो काही परतावा मिळेल तो आपल्याला पॉलिसी पूर्ण झालयावर मिळतो. याचा प्रीमियम हा तुलनेने जास्ती असतो, ज्याला इन्शुरेंस व गुंतवणूक असे एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत तो व्यक्ती अशा प्रकारचा विमा खरेदी करू शकतो.
अपघात विमा : या प्रकारचा विमा हा फक्त अपघाती मृत्यू, अपघातात दुखापत या करिता घेतला जातो. अपघाता व्यतिरिक्त इतर कोणत्या कारणाने मृत्यू झाला किंवा दुखापत झाली तर नुकसान भरपाई मिळत नाही. ज्याला कमी प्रीमियम मध्ये फक्त अपघाताच्या जोखमीसाठी विमा घ्यायचा आहे तो व्यक्ती अशा प्रकारचा विमा खरेदी करू शकतो.
2) आरोग्य विमा:
हा विमा आपल्याला आरोग्या संबंधित उपचारांसाठी आर्थिक मदतीचे वचन देतो. केवळ पैशा अभावी आपले उपचार टळले नाही पाहिजे या कारणासाठी हा विमा काढणे अतिशय आवश्यक बनले आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी वेगळा असा स्वतंत्र विमा काढता येतो किंवा एकत्रितपणे सर्वच प्रकारच्या उपचारासाठी हा विमा काढता येतो. आरोग्य ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला अनपेक्षितपणे खर्चाला सामोरे जाने अत्यंत आवश्यक असते, अशावेळी आर्थिक मदत खूप मोलाची ठरते, यामुळे हा विमा आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी काढला पाहिजे. सध्या या प्रकारचा विमा विविध कंपन्यामार्फत वार्षिक तीन-चार हजार रुपयांत अगदी सहज उपलब्ध होतो. या प्रकारच्या विम्यासाठी भरलेले पैसे परत मिळत नाहीत.
3) वाहन विमा :
आपण वाहन चालवत असताना आपल्या वाहनाने इतरांना इजा पोहोचवली, इतरांच्या वस्तूंना, घरांना, दुकानांना इजा पोहोचवली तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून थर्ड पार्टी वाहन विमा काढणे वाहन नियमांनुसार बंधनकारक आहे; यामुळे थर्ड पार्टी विमा आपण काढतोच. याव्यतिरिक्त स्वतःच्या वाहनाला, स्वतःला किंवा वाहनात बसलेल्या व्यक्तींना काही इजा झाली तर त्याच्या नुकसान भरपाईसाठी आपण फर्स्ट पार्टी म्हणून विमा काढला पाहिजे. हा विमा अतिशय स्वस्त दरात विविध कंपन्या विकत आहेत. हा विमा आपण दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा ट्रक, टेम्पो अशा कोणत्याही वाहनासाठी काढू शकतो.
4) प्रवास विमा :
बस, रेल्वे, विमान, बोट अशा पब्लिक वाहनांतून आपण प्रवास करताना जर अपघात झाला, आपल्या वस्तु चोरीला गेल्या, आपले तिकीट रद्द झाले तर या सगळ्याची नुकसान भरपाई आपल्याला या विम्यानुसार मिळते. प्रवास करण्याआगोदर तूही हा विमा काढू शकता, अगदी शंभर-दोनशे रुपयांत एक वेळच्या प्रवासासाठी हा विमा उपलब्ध होतो, प्रवास संपला ही पॉलिसी तिथेच संपते. शक्यतो हा एक तात्पुरत्या स्वरूपाचा विमा असतो.
5) प्रॉपर्टिचा विमा :
घर, दुकान, फॅक्टरी किंवा इतर कसलीही इमारत किंवा जमीन यासंदर्भात हा विमा घेतला जाऊ शकतो. आपल्या इमारतीस आग, भूकंप, वादळ किंवा इतर अनपेक्षित घटनांमुळे नुकसान होऊ शकते. हे नुकसान खूप मोठी आर्थिक हानी पोचवू शकते म्हणून आपण नियमितपणे असा विमा काढणे जोखमीचे व्यवस्थापन करते.
आपण या प्रकरणात हे ठळक असे विम्याचे प्रकार पाहिले, याव्यतिरिक्त अनेक प्रकारचा विमा विविध विमा कंपन्या विकतात. आपल्या सोईप्रमाणे आपण त्या कंपनीच्या एजंटशी संपर्क करून विमा पॉलिसी बनवू शकतो अन ती विकत घेऊ शकतो. असे असले तरी बहुतेक वेळा सर्वच जण रेडिमेड पॉलिसी विकत घेतात. विमा पॉलिसी ही आपल्याला अनपेक्षित व नको असलेल्या घटनांतून सावरण्यासाठी आर्थिक मदतीचे वचन देते, जीवन विमा आपण जेवढ्या कमी वयात घेऊ तेवढा कमी प्रीमियम आपल्याला द्यावा लागतो, शिवाय विम्याची जमा रक्कम काढून घेण्यासाठी असलेला लॉक इन पिरीयड हा तरुण वयातच संपून जातो. यामुळे भविष्यात तो विमा मोडायचा असल्यास आपल्याला जास्त आर्थिक तोटा होत नाही.
आपण कमवत असलेली संपत्ती एखाद्या किंवा काही अनपेक्षित घटनांमुळे तात्काळ खर्ची पडू शकते व होत्याचे नव्हते होऊ शकते; म्हणून त्या घटनेच्या भीतीने घाबरून नव्हे, तर ती आपली कष्टाने कमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी विमा विकत घेणे गरजेचे आहे.
◆◆◆