आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात - प्रकरण ११

फसव्या योजना


 
  कमी वेळात जास्त परतावा कमवण्याची ईच्छा सगळ्यांनाच असते. नेमकं ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काही चतुर परंतु ठगण्याचा हेतू असलेले लोक अशा योजना बनवतात. आपल्या त्या ईच्छेला खतपाणी घालून आपण बाळगलेली ईच्छा योग्यच आहे आणि ती सत्य होऊ शकते अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनात निर्माण करण्याची कला ह्या फसव्या लोकांकडे असते. पैशाच्या बाबतीत असा विश्वास निर्माण करण्यासाठी मोठ्या लोकांची भरमसाठ उदाहरणं दिली जातात. इतरांना दिलेल्या खोट्या परताव्याचे पुरावे आपल्याला दाखवले जातात. अमक्याच्या मामाचा मुलगा, तमक्याच्या आत्या कशा श्रीमंत झाल्या किंवा अमक्या-तमक्याने आमच्याकडे एवढी गुंतवणूक केली, याची उदाहरणं सांगितली जातात. आपण अशा उदाहरणांनी (ऐकीव उदाहरणे) भारावून जातो आणि  अशा फसव्या लोकांच्याकडे पैसे गुंतवतो. आपण पैसे गुंतवण्यापूर्वी एक विचार केला पाहिजे की, असे जर सहज श्रीमंत होता येत असेल तर ती योजना घेऊन हा व्यक्ती गावोगाव भटकत का फिरत आहे? तो का श्रीमंत झाला नाही? किंवा तो हे श्रीमंतीचे सीक्रेट असं वाटत का फिरत आहे? तो व्यक्ती जर अशा योजनांमुळे श्रीमंत झाला असता तर असा भटकत फिरला नसता. त्यामुळे अशा योजनांपासून दहा हात लांबच रहा.  

  फसव्या योजनांचे अनेक प्रकार समोर आले आहेत; त्यापैकी सर्रास घडलेला अन घडत असलेला प्रकार म्हणजे पॉन्झी योजना. तुम्ही अशा योजनेबद्दल ऐकले असेल की, एकाने त्याचे तीन मित्र जोडायचे त्या तिघांचे कमिशन पहिल्याला मिळणार आणि परत त्या तिघांनी प्रत्येकी तिघांना जोडायचे, अशी ही साखळी वाढत जाणार आणि सगळ्यांना कमिशन मिळत जाणार, या अशा योजनांना पॉन्झी योजना म्हणतात. असल्या योजनांमध्ये बहुतेक वेळा लोकांचाच पैसा लोकांना वाटला जातो अन खूप सारे लोक जोडले गेले की, सगळा मुद्देमाल घेऊन ती योजना चालवणारी कंपनी फरार होते. या अशा योजनेचा फटका महाराष्ट्रातील गावोगावच्या लोकांना बसला आहे. यापासून सावध रहा. असा जर सहज पैसा मिळत असता तर मोठ्या उद्योगपतींनी सगळा पैसा ह्यात गुंतवला असता, ते लोक आठ-दहा टक्के नफ्यासाठी मोठ मोठ्या कंपन्या कशाला चालवत बसले असते? झटपट पैसा फक्त लॉटरी मध्ये मिळू शकतो किंवा योगायोगाने एखाद्या शेअरचा किंवा क्रिप्टो करन्सीचा भाव कमी वेळात अनेक पटींनी वाढतो तेव्हा मिळू शिकतो. या तीन मार्गाव्यतिरिक्त झटपट पैसा कमवण्याची कोणतीच टेकनिक सध्या अस्तीत्वात नाही. तुम्ही एखादा उद्योग करून त्याचे कमी वेळात जास्त ग्राहक वाढवले तरीही तुम्ही झटपट पैसे कमवू शकता; पण काहीच न करता फक्त गुंतवणुकीतून झटपट पैसे कमवण्याच्या लॉटरी व शेअर बाजार किंवा क्रिप्टो करन्सी या तीनच शक्यता आता अस्तीत्वात आहेत.  

  आणखी एका प्रकारे लोकांना फसवले जाते. एखाद्या माहीत नसलेल्या कंपनीचा सेल्समन तुमच्याकडे येतो अन तुम्हाला कंपनीचा प्रॉडक्ट विकून कमिशन मिळू शकते असे प्रलोभण देतो. आपल्याला ही चांगली योजना वाटते आणि आपण प्रॉडक्ट विकायला तयार होतो. मग प्रॉडक्टची ऑर्डर द्यायला म्हणून आपल्याकडून अडवांस रक्कम घेतली जाते, खरी वाटणारी खोटी पावतीसुद्धा दिली जाते. पैसे घेऊन सेल्समन गायब होतो अन आपण फक्त कंपनीचा माल येईल याची वाट पाहत राहतो. या अशा बिनओळखीच्या लोकांबरोबर असले व्यवहार टाळले पाहिजेत. अशा फसव्या योजनांपासून नेहमी सावध रहा, पैशाचा लोभ नुकसान करू  शकतो. तुम्हाला कमाई वाढवायची असेल तर एकाच्या जोडीला इतर छोटे व्यवसाय करा, आहे तो व्यवसाय वाढवण्यावर लक्ष द्या, भरवश्याच्या बँक व सरकारी योजनांमध्येच पैसे गुंतवा. झटपट पैसे कमवण्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे हा सर्वात चांगला उपाय तुम्हाला फसव्या योजनांपासून नक्कीच दूर ठेवेल. 

  झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर त्याआधी शेअर बाजार काय आहे, कसा काम करतो हे शिकून घ्या. शेअर बाजारातही लगेच पैसे कमवतो असे नाही, तिथे तर तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा द्यावी लागते. वर्षानुवर्षे चांगला शेअर ओळखून होल्ड करून ठेवला तर कुठे त्याची फळे खायला मिळतात. म्हणून योग्य शिक्षण न घेता गुंतवणूक करू नका.  
◆◆◆