आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात - प्रकरण १२

इनकम टॅक्स


 
  आपण जी वर्षाकाठी कमाई करतो, त्या कमाईवर आपल्याला सरकारला कर द्यावा लागतो, याला आपण इनकम टॅक्स म्हणतो. आपली कमाई एका ठराविक रकमेपेक्षा जास्त असेल तर आपण कर देणे बंधनकारक असते. कमाईनुसार विविध टक्केवारीइतका कर आपल्याला भरावा लागतो. आपल्या देशात वर्षाला अडीच लाख पर्यन्त कमाई असेल तर कोणताही इनकम टॅक्स द्यावा लागत नाही. अडीच लाख ते पाच लाख या दरम्यान कमाई असेल तर वरच्या अडीच लाखावर 5% कर भरावा लागतो; पण जेव्हा आपण हा कर भरून इनकम टॅक्स रिटर्नचा फॉर्म सरकारला  जमा करतो तेव्हा हा कर आपल्याला परत मिळतो. म्हणजे पाच लाख उत्पन्नापर्यन्त आपल्याला सध्या कोणताही कर द्यावा लागत नाही. इनकम टॅक्स रिटर्न हा फॉर्म आपण ऑनलाइन पद्धतीने स्वतः सरकारला जमा करायचा असतो, या फॉर्म मार्फत आपण आपल्या कमाईची व विविध खर्चाची माहिती सरकारला द्यायची असते. पाच लाखाच्या वर आणि साडेसात लाखपर्यन्त कमाई असेल तर अडीच ते पाच लाख या दरम्यान 5% कर व वरच्या 2.5 लाखासाठी 10% कर भरावा लागतो.  त्यानंतर 7.5 लाख ते 10 लाख या रकमेवर 15% टॅक्स भरावा लागतो. 10 ते 12.5 लाख या रकमेवर 20%, 12.5 ते 15 लाख या रकमेवर 25% आणि 15 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्या वरच्या उत्पन्नासाठी 30% टॅक्स भरावा लागतो. टॅक्सचे हे दर प्रत्येक आर्थिक वर्षासाठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर प्रकाशित केले जातात. 

इनकम टॅक्स भरला आहे की नाही हे तपासणीसाठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटला भारतात कोठेही धाड टाकता येते व टॅक्स भरला नाही व बेहिशेबी मालमत्ता आहे हे लक्षात आल्यास दंडात्मक कारवाई किंवा जेलही होऊ शकते. म्हणून आपल्याला टॅक्स लागत जरी नसला तरीही आपल्या उत्पन्नाची माहिती आपण इनकम टॅक्स रिटर्न हा फॉर्म भरून दरवर्षी सरकारला कळवली पाहिजे. इनकम  टॅक्स भरताना आपल्याला काही खर्चासाठी सवलतीही दिल्या जातात, टॅक्स कायद्यातील विविध तरतुदींनुसार आपण त्या सवलती घेऊ शकतो. त्याबद्दल आता माहिती घेऊ.   

  सेक्शन 80C, सेक्शन 80CCC, सेक्शन 80CCD, सेक्शन 80D, सेक्शन 80G, सेक्शन 80TTA, सेक्शन 80E अशा सेक्शन अंतर्गत केलेल्या कायद्यानुसार आपण विविध कारणासाठी जसे की गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शन योजना (NPS) मध्ये गुंतवणूक वगैरेसाठी टॅक्स मध्ये सवलत मिळवू शकतो. ही सवलत सामान्यपणे जास्तीत जास्त 2 लाख पर्यन्त मिळवता येते. आपण हे समजून घेण्यासाठी उदाहरण पाहू : 

समजा, राम हा वर्षाला 10 लाख कमवतो. त्याचे एकूण दीड लाख रुपये विमा पॉलिसी, ईपीएफ, सुकन्या समृद्धी योजना यासाठी त्यावर्षी गुंतवले जातात. त्यानंतर राम आणखी पन्नास हजार रुपये NPS मध्ये गुंतवतो. मग यामुळे आता रामला 10 लाखावर टॅक्स न लगता आठच लाखावर टॅक्स लागेल, त्याचे उत्पन्न आठच लाख आहे असे मानले जाईल. आणि त्याला खलील प्रमाणे टॅक्स लागेल : 

0 ते 2.5 लाख - 0 रुपये टॅक्स  
2.5 ते 5 लाख - 5% प्रमाणे 12500 रु टॅक्स (पण हा टॅक्स परत मिळेल) 
5 ते 7.5 लाख - 10% प्रमाणे 25000 रु 
7.5 ते 8 लाख - 15% प्रमाणे 7500 रु 

अशा प्रकारे 2 लाख रकमेसाठी रामला सवलत घेता येते व एकूण 32500  इतका टॅक्स भरावा लागतो. या व्यतिरिक्त वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा इतर विविध कारणासाठी पैसे खर्च झाले असतील तर त्यानुसार कोणत्या खर्चासाठी सवलत लागू आहे हे तपासून आपण आणखी सवलत मिळवू शकतो पण या सर्व सवलतींना एक ठराविक मर्यादा आहे, त्या मर्यादेइतक्याच सवलती आपण मिळवू शकतो. 
◆◆◆