आपण आपल्या कुटुंबात आर्थिक पारदर्शकता ठेवतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःशी विचारला पाहिजे. वडिलांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल मुलाला किंवा मुलीला, आईला किती माहिती असते? याचा विचार केला तर नकारात्मक उत्तरेच जास्त मिळतात. महाराष्ट्रातील घराघरात अशी परिस्थिती आहे की वडील रिटायर व्हायला आले तरी त्यांचा पगार किती आहे याची माहिती मुलांना नसते. आपल्याच कुटुंबाशी आर्थिक गोष्टींच्या बाबतीत इतका दुरावा आपण का ठेवतो हे एक कोडंच आहे. एखाद्या मुलाने बापाला पगार विचारला तर बापाचा राग त्याला जोड्याने हाणल्याशिवाय शांत होणार नाही. वडिलांनी कुठे कुठे पैसे गुंतवून ठेवले आहेत किंवा कुठली कर्ज काढून ठेवली आहेत याची शून्य माहिती इतरांना असते. या अशा सवयींमुळे कुटुंबातील कर्ता माणूस देवाघरी गेला की त्याने गुंतवलेले पैसे बुडतातच आणि कर्ज काढून ठेवले असेल तर मग ते देणेकरी सतत चकरा मारतात. नेमके किती पैसे गुंतवले किंवा कर्ज घेतले व कोणाकडून घेतले हेच माहीत नसते. याची फळं त्या कर्त्या माणसाच्या माघारी सर्व कुटुंबाला भोगावी लागतात. त्यामुळे असले व्यवहार व्यवस्थित एका वहीत लिहून ठेवले पाहिजेत व त्याबद्दल कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांनीही आपल्या पालकांना आपण केलेल्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती दिली पाहिजे. पैशाच्या बाबतीत तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या मदतीला येत नाही. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत असल्यापासूनच बँकेचे व्यवहार, लाईट बिल भरणे, घरपट्टी, नळपट्टी काय असते व ती नगरपालिका, ग्रामपंचायत येथे जाऊन कशी भरायची हे शिकवले पाहिजे. आपल्या घराचे, जागेचे कागदपत्र कसे व कोठून काढायचे, तहसीलची कागदपत्रे जसे की रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र वगैरे कशी काढायची हे सर्व शिकवले पाहिजे. एखादा उद्योग किंवा दुकान सुरू करायचे असेल तर काय करावे लागते, व्यवसायासाठी कर्ज कसे मिळते हेही शिकवले पाहिजे. केवळ शाळेत घातले म्हणजे मुलांना आपोआप सगळं कळेल असा समज हा आपल्यालाच किंवा आपल्या कुटुंबाला भविष्यात महागात पडतो. आपण आपल्या कुटुंबात आर्थिक पारदर्शकता ठेवली तर कुटुंबात आपोआप विश्वास बळकट होतो आणि संकटकाळी नेमकी कोणती पाऊलं उचलायची याची पूर्व कल्पना सर्वांना असल्याने संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य सर्वांमध्ये आपोआप निर्माण होते. यासोबतच आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत असलो तर त्याबद्दल आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून मार्गदर्शन व त्यांच्याकडे असलेली अधिक माहिती मिळते व आपण नुकसान होण्यापासून बचावतो.
कुटुंबातील आर्थिक पारदर्शकतेबरोबर जमिनीचे, घराचे हक्क आपल्या मुला-मुलींमध्ये कशा प्रकारे द्यायचे याचे पत्र वकिलच्या मदतीने तयार करून ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने आपल्या मुलांमध्ये भविष्यात वाटणीवरुण होणारी भांडणं टळू शकतात. प्रत्येकाने असे पत्र तयार करून ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक गुजराती, मारवाडी कुटुंबं राहतात. बहुतेक वेळा असेच दिसते की ते सर्व एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. हे लोक आपल्या मुलांना लहानपणापासूनच आर्थिक शिक्षणाचे धडे देतात. कुटुंबामध्ये आर्थिक पारदर्शकता ठेवतात, यामुळे लहान वयातच त्यांची मुले पैसा कमवण्याचा विचार करू लागतात व आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाणारी विचार प्रक्रिया सुरू होते. ही अशीच विचार प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू व्हाही याच हेतूने हे छोटेसे पुस्तक सादर केले आहे. या पुस्तकातील बहुतेक माहिती अनेकांना माहीतही असेल किंवा ही माहिती म्हणजे अगदीच प्राथमिक स्वरूपाची वाटेल पण हीच माहिती आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाणारी विचार प्रक्रिया आपल्या डोक्यात नक्कीच सुरू करेल असा मला विश्वास आहे आणि म्हणूनच ही माहिती म्हणजे 'श्रीमंतीची सुरुवात' आहे असे मी म्हणेन.
या साहित्यासाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत !
वाचकहो, ही प्रकरणे उपयुक्त वाटली असतील तर Help PaayTrade या पेजला भेट द्या
◆◆◆