टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण २


टेक्निकल एनालिसिस कशासाठी ? 
 
 
एखाद्या शेअर मध्ये कोणत्या वेळी प्रवेश करावा, कोणत्या वेळी व्यवहारातून बाहेर पडावे, कोणत्या वेळी व्यवहार टाळावा, शेअरची किंमत किती वर किंवा खाली जाऊ शकते, व्यवहारात किती रिस्क असू शकते व फायदा किती असू शकतो या बद्दलच्या श्यक्यता जाणून घेण्यासाठी टेक्निकल एनालिसिस महत्वाचे आहे. बर्‍याच वेळा आपले शेअरच्या किमतीचे वर किंवा खाली जाण्याबाबतचे अंदाज योग्य असतात परंतु केवळ चुकीच्या वेळी व्यवहारात प्रवेश केल्यामुळे किंवा त्यातून बाहेर पडल्यामुळे नुकसान होते. हे असे नुकसान कमी करण्याचे काम योग्य प्रकारे केलेले टेक्निकल एनालिसिस करू शकते.  

शेअर बाजारात पाच हजारहून जास्त कंपन्या आहेत. मग आता या इतक्या कंपन्यापैकी नेमकं कोणत्या मोजक्या कंपन्यामध्ये खरेदीची किंवा विक्रीची संधी निर्माण झाली आहे हे एक एक कंपनीचे संपूर्ण विश्लेषण करून ओळखायचे झाल्यास एका कंपनीसाठी एक दिवस लागला असे मानले तर ५००० दिवस म्हणजे १३ वर्षाहून अधिक काळ लागेल ! मात्र ५००० जणांनी एकदम विश्लेषण केले तर एका दिवसात शक्य आहे. पण हे शेअर मार्केटचे ज्ञान असणारे ५००० लोक तुम्ही आणणार कुठून ? तुम्हाला एकट्यालाच हे विश्लेषण करावे लागणार आहे. म्हणून काही निवडक कंपन्या शोधण्यासाठी टेक्निकल व फंडामेंटल एनालिसिस उपयोगी येते. ५०००  कंपन्याना फंडामेंटल एनालिसिसचे विविध निकष लावून तुम्ही त्या निकषांमध्ये बसणार्‍या काही कंपन्या फिल्टर करू शकता, मग त्यांना टेक्निकल एनालिसिसचे निकष लावून त्यापैकी नेमक्या अशा कंपन्या निवडू शकता ज्यात खरेदीची किंवा विक्रीची संधी निर्माण झाली आहे व तो व्यवहार एक चांगला नफा देऊ शकेल अशा कंपन्या निवडू शकता. किंवा याउलटही तुम्ही करू शकता, म्हणजे आधी टेक्निकल एनालिसिसचे निकष व मग फंडामेंटलचे निकष. मात्र टेक्निकल व फंडामेंटल हे दोन्ही एनालिसिस करूनच एखाद्या व्यवहारात प्रवेश करणे किंवा त्यातून बाहेर पडणे अधिक फायद्याचे किंवा कमी रिस्कचे ठरू शकते.  

फंडामेंटल एनालिसिसच्या तुम्हाला हव्या असणार्‍या निकषांच्या आधारे कंपन्या फिल्टर करण्यासाठी तुम्ही सर्व कंपन्यांचा डाटा एक्सेल फाइलमध्ये टाकून तेथून फिल्टर करू शकता. मात्र कुठल्या कंपनीचा चार्ट पॅटर्न कसा बनला आहे हे फिल्टर करणे कठीण काम आहे तरी इंटरनेटवर काही वेबसाइट या प्रकारचे चार्ट बेस्ड फिल्टर उपलब्ध करून देतात त्याची माहिती मिळवली तर हे एनालिसिस करणे अधिक सोपे व कमी वेळात होईल त्याचबरोबर फंडामेंटल एनालिसिससाठीही अशाप्रकारचे फिल्टर इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्याबद्दलची माहिती आपण पुढे सविस्तर घेऊया. 
◆◆◆