टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण ३

चार्ट चे प्रकार 

 

टेक्निकल एनालिसिस हे मुख्यतः शेअरच्या किंमतीचा चार्ट पाहून केले जाते. भूतकाळामध्ये अमका-तमका चार्टचा पॅटर्न तयार झाला तर जे झाले होते तशाच प्रकारचा चार्ट पॅटर्न पुन्हा तयार झाला तर त्याच्या मिळतेजुळते भविष्यकाळात घडू शकते हा या एनालिसिसचा आधार असतो. जसे भूतकाळात झाले तसेच किंवा मिळतेजुळते भविष्यकाळात घडते ही काही जादू आहे का ? नाही ! जादू नाहीच ! हे असे घडते ते माणसाच्या न बदललेल्या स्वभावामुळे ! चार्टचा पॅटर्न खाली घसरताना दिसला की सगळे शेअर धडाधड विकायला काढायचे, वर सरकताना दिसला की भरमसाठ खरेदी करायची या माणसाच्या स्वभावामुळे जे भूतकाळात घडले ते पुन्हा पुन्हा घडते. मी एकदा माझ्या पाळीव मांजरला शिकवलं की एक म्हटलं की नाच, दोन म्हटलं की उड्या मार आणि तो ते शिकला, नंतर त्या मांजरणे गावातील सगळ्या मांजरांना हे शिकवलं, आता कोणीही एक म्हटलं की सगळी मांजरं नाचतात व दोन म्हटलं की उड्या मारतात ! असो, विविध कालावधीसाठी शेअरची किंमत दाखवणार्‍या चार्टचे अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत आता त्याची माहिती आपण पाहूया. 

१. लाइन चार्ट: शेअरची विविध कालावधीची किंमत ही एका लाइनने जोडलेली असते व त्यातून चढ-उतार दाखवणारी एक लाइन अशा चार्टवर दिसते. ही लाइन फक्त क्लोसिंग प्राइस दर्शविते, एखाद्या वेळेची लो किंवा हाय प्राइस यावरून कळू शकत नाही. 



२. बार चार्ट: एक उभी रेष व तिच्या माथ्याशी एका बाजूला आडवी रेषा व पायथ्याशी एका बाजूला आडवी रेषा असा एक बार तयार होतो. विविध कालावधीसाठी असे अनेक बार तयार होतात व चार्ट वर दिसतात. डाव्या बाजूची आडवी रेषा ही ओपन प्राइस तर उजव्या बाजूची आडवी रेषा की क्लोज प्राइस दाखवते. एखाद्या कालावधीसाठी किंमत पडणे व वधारणे या दोन्ही घटनांसाठी वेगवेगळ्या रंगाचा बार तयार होतो. किंमत वधारली हे दाखवणार्या बार ला 'बुलीश बार (bullish bar)' तर किंमत पडली हे दाखवणार्या बार ला 'बेयरीश बार (bearish bar)' असे म्हणतात. ओपनिंग प्राइस, क्लोसिंग प्राइस, लो, हाय ही सर्व माहिती बारवरुन कळते.


३. कॅन्डलस्टिक चार्ट: एक चौकोनी डब्बा व त्याच्या मध्यात वरच्या बाजूला एक उभी रेषा किंवा खालच्या बाजूला एक उभी रेषा किंवा दोन्ही बाजूला उभ्या रेषा किंवा फक्त चौकोनी डब्बा अशा प्रकारची आकृती कॅन्डलची बनते.  शेअरची किंमत एखाद्या कालावधीसाठी जितकी वर किंवा खाली जाईल तितक्या अंतराच्या उंचीची ही कॅन्डल बनते. विविध कालावधीसाठी अश्या अनेक कॅन्डल तयार होतात व चार्ट वर दिसतात. एखाद्या कालावधीसाठी किंमत पडणे व वधारणे या दोन्ही घटनांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या कॅन्डल तयार होतात. साधारणतः किंमत वधारली असेल तर हिरवी कॅन्डल व पडली असेल तर लाल कॅन्डल तयार होते. 
 

तुम्ही चार्टच्या सेट्टिंगमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो रंग कॅन्डलसाठी निवडू शकता. कॅन्डलचे रंग असे निवडावे की तुम्हाला अगदी सहज कोणती कॅन्डल कशी बनली आहे हे दिसले पाहिजे. किंमत वधारली हे दाखवणार्‍या कॅन्डल ला 'बुलीश कॅन्डल (bullish candle)' तर किंमत पडली हे दाखवणार्‍या कॅन्डल ला 'बेयरीश कॅन्डल (bearish candle)' असे म्हणतात. कॅन्डलच्या मधल्या चौकोनी डब्याच्या भागाला तिची 'बॉडी (body)' म्हणतात. तर या बॉडीच्या माथ्यावर व पायथ्याशी ज्या उभ्या रेषा बनतात त्यांना तिची 'शाडो (shadow)' किंवा 'विक (wick)' म्हणतात. माथ्यावरच्या शाडोला 'अपर शाडो (upper shadow)' तर पायथ्याखालील शाडोला 'लोवर शाडो (lower shadow)' म्हणतात. ओपनिंग प्राइस, क्लोसिंग प्राइस, लो, हाय ही सर्व माहिती कॅन्डलवरुन कळते. कॅन्डल चार्ट हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा चार्ट आहे. याचेही नंतर दोन-तीन प्रकार पडले परंतु सर्रास वापरला जाणारा साधा म्हणजे 'जपानी कॅन्डलस्टिक चार्ट' टेक्निकल एनालिसिससाठी वापरला जातो. आपण याच चार्टमध्ये तयार होणार्‍या विविध कॅन्डल व पॅटर्नविषयी माहिती घेणार आहोत. खालील इमेजमध्ये मी बुलीश कॅन्डलसाठी पांढरा रंग वापरला आहे ज्यामुळे मला ती ओळखणे खूप सोयिस्कर होते.
 
कॅन्डलस्टिकचा उपयोग शेअर बाजारपूर्वी १८व्या शतकापासून जपान मध्ये होत असे. तेथील तांदळाचा व्यापार करणार्‍या एका व्यापार्‍याने तांदळाचे वर्षभरातील भाव कसे-कसे बदलतात हे दर्शवण्यासाठी कॅन्डलस्टिक रेखाटली व नंतर जपानचे इतर व्यापारीसुद्धा अशाप्रकारे विविध वस्तूंचे भाव रेखाटू लागले. १९८० पर्यन्त जपान सोडून इतर देशांना याचा थांगपत्ताही नव्हता. १९८० मध्ये एका अमेरिकन ट्रेडरने आपल्या पुस्तकातून ही कॅन्डलस्टिक व हा चार्ट जगासमोर आणला. तेव्हापासून जगतील सर्वच शेअर बाजारामध्ये शेअरच्या किंमतीचे चढ-उतार दाखवण्यासाठी या चार्टचा सर्रास वापर होतो.  कॅन्डलस्टिक ही मुळात जपानी असल्याने तिच्या संबंधी येणारे शब्दही जपानी आहेत व त्यामुळे आपल्याला ते थोडेसे विचित्र वाटू शकतात. 
◆◆◆