टेक्निकल एनालिसिस : बेसिक्स - प्रकरण ४

कॅन्डलस्टिक व पॅटर्न चे प्रकार 

  

बुलीश कॅन्डल: एखाद्या कालावधीमध्ये शेअरची किंमत वधारली हे दाखवणारी कॅन्डल म्हणजे बुलीश कॅन्डल. शेअरची किंमत ओपन पासून वर जात कॅन्डलच्या वरच्या बाजूस क्लोस होणे हा बुलीश कॅन्डलचा गुणधर्म आहे. एखादा शेअर एका दिवशी १०० रु किंमतीला ओपन होऊन खाली जात ९५ पर्यन्त गेला व परत वर जात-जात ११५ पर्यन्त गेला, तिथून खाली ११० ला येऊन क्लोज झाला तर खाली दाखवल्याप्रमाणे त्या दिवसाची बुलीश कॅन्डल बनेल.


बेयरीश कॅन्डल: एखाद्या कालावधीमध्ये शेअरची किंमत पडली हे दाखवणारी कॅन्डल म्हणजे बेयरीश कॅन्डल. शेअरची किंमत ओपन पासून खाली जात कॅन्डलच्या खालच्या बाजूस क्लोस होणे हा बेयरीश कॅन्डलचा गुणधर्म आहे. एखादा शेअर एका दिवशी ११० रु किंमतीला ओपन होऊन वरी जात ११५ पर्यन्त गेला व परत खाली जात-जात ९५ पर्यन्त गेला, तिथून वरी १०० ला येऊन क्लोज झाला तर खाली दाखवल्याप्रमाणे त्या दिवसाची बेयरीश कॅन्डल बनेल. 


मारूबोजू कॅन्डल: मारूबोजू म्हणजे 'टकला'. नावाप्रमाणेच या कॅन्डलच्या बॉडीला अपर किंवा लोवर शाडो नसते म्हणून हिला मारूबोजू अर्थात टकली कॅन्डल म्हणतात. म्हणजे एका बुलीश कॅन्डलसाठी तिची ओपन प्राइस हाच लो व क्लोज प्राइस हाच हाय. तर याउलट एका बेयरीश कॅन्डलसाठी तिची ओपन प्राइस हाच हाय व क्लोज प्राइस हाच लो.


बुलीश मारूबोजू कॅन्डल हे सांगते की त्या कालावधीत बाजारात केवळ खरेदी करणारे लोक जास्त होते व त्यामुळे त्यांनी टाकलेल्या खरेदीच्या ऑर्डरमुळे शेअरची किंमत जराही वेळ खाली न पडता केवळ वर-वर जात राहिली. ही कॅन्डल चार्टवर कुठेही तयार झालेली पाहायला मिळते मात्र जेव्हा ही एका डाउन ट्रेंड नंतर ट्रेंडच्या तळाला किंवा ट्रेंड वर उठल्यावर त्याच्या आसपास तयार होते तेव्हा हिला जास्त महत्व आहे. म्हणजे अशावेळी खरेदी करणारे भरपूर लोक बाजारात आले आहेत व ते किंमत वर घेऊन जाऊ शकतात असा संकेत मिळतो.  

बेयरीश मारूबोजू कॅन्डल हे सांगते की त्या कालावधीत बाजारात केवळ विक्री करणारे लोक जास्त होते व त्यामुळे त्यांनी टाकलेल्या विक्रीच्या ऑर्डरमुळे शेअरची किंमत जराही वेळ वर न जाता केवळ खाली-खाली येत राहिली. ही कॅन्डल चार्टवर कुठेही तयार झालेली पाहायला मिळते मात्र जेव्हा ही एका अप ट्रेंड नंतर ट्रेंडच्या टॉपला किंवा ट्रेंड खाली जाऊ लागल्यावर त्याच्या आसपास तयार होते तेव्हा हिला जास्त महत्व आहे. म्हणजे अशावेळी विक्री करणारे भरपूर लोक बाजारात आले आहेत व ते किंमत खाली घेऊन जाऊ शकतात असा संकेत मिळतो.  

प्यूअर मारूबोजू कॅन्डल फार क्वचितच तयार होतात त्यामुळे ज्या कॅन्डलच्या बॉडीला अगदी छोट्या-छोट्या शाडो आहेत त्यांनाही त्या मारूबोजू आहेत असे मानले जाते. जेव्हा केव्हा प्यूअर मारूबोजू तयार होते तेव्हा तो एक तगडा संकेत असतो असे मानतात. 

बुलीश मारूबोजू तेजीचे संकेत देते व ही कॅन्डल पाहून ट्रेड करताना काही लोक या कॅन्डलच्या लगेच नंतरच्या कालावधीत खरेदी करतात. अशावेळी समजा आपला अंदाज चुकला व मार्केट उलटदिशेने फिरले तर त्यापासून होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी मारूबोजूची लो प्राइस ही स्टॉपलॉस म्हणून ठेवली जाते. तर काही लोक मारूबोजू नंतर आणखी एक बुलीश कॅन्डल तयार होते का ते पाहतात व तशी कॅन्डल तयार झाली की मग खरेदी करतात व हे लोकही साधारणपणे मारूबोजूची लो प्राइस स्टॉपलॉस म्हणून ठेवतात. 

बेयरीश मारूबोजू मंदीचे संकेत देते. ही कॅन्डल पाहून ट्रेड करताना या कॅन्डलच्या लगेच नंतर किंवा या कॅन्डल नंतर आणखी एक बेयरीश कॅन्डल तयार होते का हे पाहून लोक विक्री करतात किंवा शॉर्ट सेल करतात. अशा वेळी मारूबोजूची हाय प्राइस ही स्टॉपलॉस म्हणून ठेवली जाते. 

मारूबोजू कॅन्डल पाहून ट्रेड करताना जर ती कॅन्डल तिच्या आसपासच्या इतर कॅन्डल पेक्षा खूप छोटी असेल तर लोक ट्रेड करायचे टाळतात कारण कॅन्डल छोटी आहे म्हणजे त्यातून मिळणारे तेजीचे किंवा मंदीचे संकेत हे तगडे नाहीत असे मानले जाते.  


वरील इमेजमध्ये Box - 1 मध्ये बुलीश मारूबोजू तयार झाली आहे व त्यानंतर तिचा टॉप तोडणारी एक बुलीश कॅन्डल तयार झाली आहे आणि पुढे मार्केट कसे वर गेले ते तुम्ही पाहू शकता. Box - 2 मध्ये बेयरीश व नंतर लगेच बुलीश मारूबोजू तयार झाली आहे व त्यानंतर आणखी एक बुलीश कॅन्डल तयार झाली आहे. अशावेळी जर कोणी हे तेजीचे संकेत मानून ट्रेड केला असता तर त्याला किती नुकसान झाले असते हे त्यापुढील उतरता चार्ट पाहून तुमच्या लक्षात आले असेलच. म्हणजे नेहमीच हे कॅन्डल किंवा इतर कोणतेही कॅन्डल किंवा पॅटर्न खरे भाकीत करेल असे नसते, म्हणून प्रत्येक व्यवहार करताना अनपेक्षित असे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी स्टॉपलॉस लावणे  गरजेचे आहे. आता वरील इमेजमध्ये Box - 3 व 4 बेयरीश मोरूबोजू दाखवतात व त्यानंतर मार्केट कसे खाली गेले आहे ते दिसते. 

स्पिंनिग टॉप कॅन्डल: छोटी बॉडी, अप्पर शाडो व लोवर शाडो एक समान लांबीच्या अशाप्रकारे ही कॅन्डल बनते. या कॅन्डलच्या रंगाला महत्व नाही मात्र ती कोणत्या वेळी बनते याला महत्व आहे.  ही कॅन्डल पाहून बाजारात लगेच खरेदी करण्याचे किंवा विक्री करण्याचे संकेत मिळत नाहीत पण बाजाराचा आतापर्यंत चालत आलेला ट्रेंड आता थांबणार आहे व येणार्‍या काळत बाजार ट्रेंडच्या विरुद्ध जाऊ शकतो किंवा आहे तो ट्रेंड आणखी जोरात सुरू राहू शकतो हे या कॅन्डलला पाहून समजते. मात्र नेमका कोणत्या दिशेला बाजार जाणार हे कळत नाही.   


ही कॅन्डल पाहून बायर व सेलर लोक एखाद्या कालावधीत समान ताकतीने ऑर्डर टाकत आहेत हे कळते व या कॅन्डल नंतर बाजारात काहीतरी मोठी मूवमेंट होणार हे संकेत मिळतात. मग ते तेजीचे किंवा मंदीचे असे कोणतेही संकेत असू शकतात. बाजारात येणार्‍या वादळाबद्दल अलर्ट करणारी कॅन्डल म्हणुन लोक हिच्याकडे पाहतात. 


वरील इमेज मध्ये box मध्ये arrow ने दाखवलेली कॅन्डल तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडायला हवा की चार्टवर तर इतर अनेक कॅन्डल या स्पीनिंग टॉप कॅन्डल सारख्या दिसत आहेत मग त्या का स्पिंनिग टॉप नाहीत ? याचे उत्तर असे की ज्या कॅन्डलच्या शाडो तिच्या बॉडी इतक्या किंवा  त्यापेक्षा अधिक व दोन्ही बाजूस समान लांबीच्या दिसतील व त्या कॅन्डलच्या शाडो इतर स्पीनिंग टॉप सारख्या दिसणार्‍या आसपासच्या कॅन्डलपेक्षा मोठ्या असतील व बॉडी लहान असेल ती कॅन्डल स्पीनिंग टॉप मनाली जाते. म्हणुन हिला चार्टवर शोधणे थोडे अवघडच काम आहे.
 
हॅमर व हँगिंग मॅन: वरती छोटी बॉडी व तीच्याखाली लांबसडक (बॉडीच्या दुप्पट किंवा जास्त) लोवर शाडो अशी ही कॅन्डल असते. या कॅन्डलला थोडीशी अपर शाडो असली तरी ती हीच कॅन्डल आहे असे मानतात. या कॅन्डलच्या रंगाला महत्व नसते तर ती कुठे तयार झाली आहे याला महत्व असते. एका बर्‍यापैकी मोठ्या डाउन ट्रेंडनंतर तळला अशी कॅन्डल बनली तर तिला 'हॅमर (Hammer)' म्हणतात. हॅमर कॅन्डल तेजीचे संकेत दाखवते. एका बर्‍यापैकी मोठ्या अप ट्रेंडनंतर वरती अशी कॅन्डल बनली तर तिला 'हँगिंग मॅन (Hanging man)' म्हणतात. हँगिंग मॅन कॅन्डल मंदीचे संकेत दाखवते. केवळ एका ट्रेंड नंतर अशी कॅन्डल बनली तरच तिला महत्व देतात, अधे-मधे कुठेही ही बनली तर तिला तितके महत्व देत नाहीत. या कॅन्डल पाहून ट्रेड करताना कॅन्डलच्या शाडोच्या मध्यावर असणारी प्राइस स्टॉपलॉस म्हणून लावतात. 


वरील इमेजमध्ये Box - 1 मध्ये खूप सारे हॅमर तयार झालेले दिसतात व त्यांनातर बाजार काही काळ वर गेलेला दिसतो. Box - 2 मध्ये दोन हँगिंग मॅन तयार झालेले दिसतात व त्यानंतर बाजार काही काळ खाली पडलेला दिसतो. 

शूटिंग स्टार कॅन्डल:  खाली छोटी बॉडी व लांबलचक अपर शाडो अशी ही कॅन्डल बनते. म्हणजे हॅमर किंवा हँगिंग मॅनच्या अगदी उलटी अशी ही कॅन्डल बनते. एका बर्‍यापैकी मोठ्या अप ट्रेंड नंतर किंवा साइडवे ट्रेंडमध्ये अशी कॅन्डल बनली तर असे मानले जाते की बाजारात त्या घटकेला सेलर अधिक प्रमाणात आहेत व ते सेलर येणार्‍या काळात बाजार खालच्या दिशेने जायला करणीभूत ठरू शकतात. म्हणजे ही कॅन्डल मंदीचे संकेत दाखवते. ही कॅन्डल पाहून ट्रेड करताना हिची हाय प्राइस स्टॉपलॉस म्हणून ठेवतात. 


वरील इमेज मध्ये box मध्ये तुम्ही शूटिंग स्टार ही कॅन्डल तयार झालेली पाहू शकता व त्यानंतर बाजार कसा खाली कोसळला आहे हे दिसते. 

एनगल्फिंग कॅन्डल पॅटर्न: हा पॅटर्न बुलीश व बेयरीश अशा दोन्ही प्रकारचा असतो. पुढच्या कॅन्डलने मागच्या कॅन्डलला पूर्ण झाकणे किंवा गिळून टाकणे असा या पॅटर्नचा अर्थ होतो. दोन कॅन्डलचा हा पॅटर्न असतो.   

बुलीश एनगल्फिंग पॅटर्न मध्ये एका बेयरीश कॅन्डल नंतर त्या बेयरीश कॅन्डलपेक्षा मोठी अशी बॉडी असलेली, बेयरीश कॅन्डलपेक्षा खालची किंवा बरोबरीची ओपन प्राइस व वरची क्लोस प्राइस असलेली, बेयरीश कॅन्डलपेक्षा वरची किंवा बरोबरीची लो व हाय प्राइस असलेली अशी, त्या बेयरीश कॅन्डलला गिळून टाकणारी एक बुलीश कॅन्डल बनते. हा पॅटर्न एका डाउन ट्रेंड नंतर तळाला बनला तर याला जास्त महत्व देतात.  

बेयरीश एनगल्फिंग पॅटर्न मध्ये एका बुलीश कॅन्डल नंतर त्या बुलीश कॅन्डलपेक्षा मोठी अशी बॉडी असलेली, बुलीश कॅन्डलपेक्षा वरची किंवा बरोबरीची ओपन प्राइस व खालची क्लोस प्राइस असलेली, बुलीश कॅन्डलपेक्षा खालची किंवा बरोबरीची लो व हाय प्राइस असलेली अशी, त्या बुलीश कॅन्डलला गिळून टाकणारी एक बेयरीश कॅन्डल बनते. हा पॅटर्न एका अप ट्रेंड नंतर वरती बनला तर याला जास्त महत्व देतात.  

एनगल्फिंग कॅन्डल आकाराने मोठी असायला हवी. अगदीच छोट्या कॅन्डलला जास्त महत्व नसते. 



वरील इमेजमध्ये box मध्ये एक बेयरीश एनगल्फिंग कॅन्डल पॅटर्न तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बाजार कसा खाली गेला आहे ते दिसते. 


वरील इमेजमध्ये box मध्ये दाखवल्याप्रमाणे बुलीश एनगल्फिंग कॅन्डल पॅटर्न तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बाजार कसा वर गेला आहे ते दिसते. 

डोजी कॅन्डल पॅटर्न: या पॅटर्न मध्ये डोजी नावाची कॅन्डल अगदी स्पिंनिंग टॉप कॅन्डल सारखीच असते मात्र हिची बॉडी आणखीन लहान असते व बॉडीच्या तुलनेत शाडो दुपटीपेक्षा जास्त असतात. डोजी ही कॅन्डल बाजारातील अनिश्चितता दर्शवते. केवळ ही एक कॅन्डल पाहून ट्रेड केला जात नाही तर हिच्या सोबत असणार्या कॅन्डल पाहाव्या लागतात म्हणून हा एक कॅन्डल पॅटर्न म्हटला जातो. डोजी कॅन्डल कोणत्या रंगाची बनली आहे याला महत्व नसते.  

बुलीश डोजी कॅन्डल पॅटर्न हा एका डाउन ट्रेंडच्या तळाला बनतो तेव्हा याला जास्त महत्व असते. एका डोजी कॅन्डल नंतर तिचा हाय तोडून क्लोज झालेली बुलीश कॅन्डल असा पॅटर्न तेजीचे संकेत दर्शवतो किंवा डाउन ट्रेंड आता थांबू शकतो हे संकेत देतो. याच्याप्रमाणे ट्रेड करताना डोजीची लो प्राइस स्टॉपलॉस म्हणून ठेवली जाते. 

बेयरीश डोजी कॅन्डल पॅटर्न हा एका अप ट्रेंडच्या वरती बनतो तेव्हा याला जास्त महत्व असते. एका डोजी कॅन्डल नंतर तिचा लो तोडून क्लोज झालेली बेयरीश कॅन्डल असा पॅटर्न मंदीचे संकेत दर्शवतो किंवा अप ट्रेंड आता थांबू शकतो हे संकेत देतो. याच्याप्रमाणे ट्रेड करताना डोजीची हाय प्राइस स्टॉपलॉस म्हणून ठेवली जाते.  

                                                                                                                                                                      वरील इमेजमध्ये बुलीश डोजी पॅटर्न तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बाजार कसा वर गेला आहे ते दिसते. 


वरील इमेजमध्ये बेयरीश डोजी पॅटर्न तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काही काळ बाजार कसा खाली गेला आहे ते दिसते.

बुलीश हरामी पॅटर्न: हा पॅटर्न तेजीचे संकेत दर्शवतो. या पॅटर्न मध्ये एका डाउन ट्रेंड नंतर तळाला एका लो बनवणार्या बेयरीश कॅन्डल नंतर त्यापेक्षा वरचा लो असणारी व मध्यम आकाराची बॉडी असणारी एक बुलीश कॅन्डल  बनते. हा पॅटर्न पाहून ट्रेड करताना या बुलीश कॅन्डलचा लो हा स्टॉपलॉस म्हणून ठेवला जातो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की बेयरीश कॅन्डलचा लो हा त्या डाउन ट्रेंडचा सर्वात लो असला पाहिजे.


वरील चार्ट मध्ये बॉक्स मध्ये दाखवल्याप्रमाणे एका बेयरीश कॅन्डल नंतर एक बुलीश कॅन्डल बनली व त्यानंतर एक मोठी बुलीश कॅन्डल बनलेली दिसत आहे. हा एक चांगला संकेत होता. 

बेयरीश हरामी पॅटर्न: हा पॅटर्न मंदीचे संकेत दर्शवतो. या पॅटर्न मध्ये एका अप ट्रेंड नंतर टॉपला एका हाय बनवणार्या बुलीश कॅन्डल नंतर त्यापेक्षा खालचा हाय असणारी व मध्यम आकाराची बॉडी असणारी एक बेयरीश कॅन्डल  बनते. हा पॅटर्न पाहून ट्रेड करताना या बेयरीश कॅन्डलचा हाय हा स्टॉपलॉस म्हणून ठेवला जातो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की बुलीश कॅन्डलचा हाय हा त्या अप ट्रेंडचा सर्वात हाय असला पाहिजे.
 

वरील चार्ट मध्ये पहिल्या बॉक्स मध्ये एका शूटिंग स्टार कॅन्डल नंतर एक मध्यम आकाराची बेयरीश कॅन्डल बनली, या दोन्ही कॅन्डल मिळून 'बेयरीश हरामी' हा पॅटर्न बनला. पण पुढे जाऊन दुसर्या बॉक्स मध्ये एक मोठी बुलीश कॅन्डल बनली व तिचा हाय मागील सर्व कॅन्डल पेक्षा वरचा आहे. या कॅन्डल मुळे पहिल्या बॉक्स ला पाहून आपण ट्रेड केला असेल तर आपला स्टोपलॉस हिट झाला असेल. या बुलीश कॅन्डल नंतर पुन्हा एक बेयरीश कॅन्डल बनली, आता या दोन्ही कॅन्डल मिळून पुन्हा एकदा 'बेयरीश हरामी' हा पॅटर्न बनला. त्यानंतर बाजार कसा खाली गेला ते दिसत आहे.  

मॉर्निंग स्टार व ईवनिंग स्टार पॅटर्न: मॉर्निंग स्टार पॅटर्न हा तेजीचे संकेत दर्शवतो. हा पॅटर्न अगदी डोजी व स्पीनिंग टॉप पॅटर्न सारखाच आहे. डोजी व स्पीनिंग टॉप मध्ये आपण डोजी व त्यानंतर बनणारी बुलीश कॅन्डल विचारात घेतो, इथे मात्र डोजी किंवा स्पिंनिग टॉप पूर्वीची कॅन्डल, डोजी किंवा स्पिंनिग टॉप, डोजी किंवा स्पिंनिग टॉप नंतरची कॅन्डल अशा तीन कॅन्डल विचारात घेतल्या जातात. या पॅटर्न मध्ये डोजी किंवा स्पिंनिग टॉप नंतर बनणारी बुलीश कॅन्डल ही गॅप अप ओपन झाली पाहिजे. एका डाउन ट्रेंडच्या तळाला हा पॅटर्न बनतो. 

ईवनिंग स्टार पॅटर्न हा मंदीचे संकेत दर्शवतो. हा पॅटर्न मॉर्निंग स्टार पॅटर्नच्या अगदी विरुद्ध असतो. या पॅटर्न मध्ये डोजी किंवा स्पिंनिग टॉप नंतर बनणारी बेयरीश कॅन्डल ही गॅप डाउन ओपन झाली पाहिजे. एका अप ट्रेंडच्या वर हा पॅटर्न बनतो.  वरती दिलेले डोजी कॅन्डल पॅटर्नचे चार्ट यासाठी पाहू शकता. 

हे आहेत काही महत्वाचे कॅन्डल पॅटर्न. याव्यतिरिक्त आणखी पॅटर्नही आहेत मात्र तेही पहिले तर तुम्ही गोंधळून जाल. कारण आपण पाहिलेले पॅटर्न व ते पॅटर्न यात खूप छोटा छोटा फरक आहे, ज्यामुळे सर्वच पॅटर्न एकसारखे वाटायला लागतील व मग ते ओळखणे हेच महाकठिण काम होऊन बेसल व त्यातच वेळ निघून जाईल. मग ट्रेड करणार कधी ? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जितकं सुटसुटीत व सहजपणे, मोजकेच असे तुम्ही टेक्निकल एनालिसिस कराल तितकं ते तुम्हाला फायदा देऊन जाईल. मोजक्याच पॅटर्नवर प्रभुत्व मिळवा, तुम्ही इतरांपेक्षा अनेक पटींनी पुढे असाल. केवळ एका पॅटर्नचा मास्टर असलेला माणूस इतर दहा पॅटर्न पाहून ट्रेड करत असलेल्या माणसाला कमाईच्या बाबतीत काही दिवसात मागे टाकू शकतो. ज्या शेअर मध्ये तुमचा पॅटर्न तयार होईल तिथेच तुम्ही ट्रेडची संधी शोधा. मार्केट मध्ये ३०० च्या आसपास फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत. त्यापैकि पाच-सात मध्ये तरी तुम्हाला हवा असलेला पॅटर्न नेहमी बनतच असतो. हा पॅटर्न कुठे तयार झालाय हे शोधण्यासाठी तुम्हाला पॅटर्न शोधणारा फिल्टर वापरावा लागेल. तो इंटरनेटवर कुठे मिळेल व तो कसा वापरायचा याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल किंवा तुम्ही हे कोणाकडून तरी शिकूही शकता. 
◆◆◆